मुसळधार पाऊस, पूरस्थिती विचारात घेऊन सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी: शरद पवार

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार आणि खासदार आपले एक महिन्याचे वेतन हे पूरग्रस्तांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (संग्रहित छायाचित्र) (Photo credits: shrad_pawar/facebook)

Maharashtra Monsoon 2019: कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), पुणे (Pune) जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने ही स्थिती विचारात घेऊन मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार आणि खासदार आपले एक महिन्याचे वेतन हे पूरग्रस्तांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीवर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. या वेळी बोलताना पवार म्हणाले की, आपण आजवर अनेक पूर पाहिले. अपत्ती निवारण समितीसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मला संधी मिळाली. यावर अशी स्थिती मी अनेकदा पाहिली. पण, या वेळची स्थिती अभूतपूर्व अशी आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरासोबतच जमीनीवरील मातीही मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आहे. त्यामुळे या पूराचा फटका शेती आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर बसणार, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, या वेळी बोलताना पवार म्हणाले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली असून, आम्ही कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आपले एक महिन्याचे वेतन हे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध संघटना पूरग्रस्तांच्या मततीसाठी आवश्यक तेथे प्रत्यक्ष जाऊन काम करणार आहेत. जसे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेडीकल सेल हा पूरग्रस्त भागात जाऊन पूरग्रस्तांना औषधोपचारांची मदत करेन, असे पवार यांनी सांगितले. (हेही वाचा, देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या नव्या ठिकाणाची नोंद; महाबळेश्वर, ताम्हिणी येथे चेरापुंजीपेक्षाही अधिक पर्जनवृष्टीची नोंद)

दरम्यान, ही वेळ कोणी काय केले हे पाहण्याचे किंवा आरोप-प्रत्यारोप करण्याची नव्हे. आजवरचा अनुभव पाहता प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही संकटात अग्रेसर राहात असे. मात्र, या वेळी पहिल्यांदाच महाराष्ट्राला पाहायला मिळाले की, प्रशासनाने पूरस्थिती कार्यक्षमता दाखवली नाही. सरकारने याची गांभीर्याने नोंद घेऊन पावले टाकायला हवीत असेही पवार या वेळी म्हणाले.