Maharashtra MLC Elections: विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांसाठी 30 सप्टेंबरपासून सुरू होणार मतदार नोंदणी; संपूर्ण कार्यक्रम जाहीर, घ्या जाणून

यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही माहिती दिली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल असे देशपांडे यांनी सांगितले.

Maharashtra Legislature | (File Photo)

विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही माहिती दिली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल असे देशपांडे यांनी सांगितले.

या मतदारसंघांची मुदत पुढच्या वर्षी म्हणजेच जुलै २०२४ ला संपणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी दरवेळी मतदारांची नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांकरिता येत्या ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल. हा टप्पा ६ नोव्हेंबरला संपेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीतही मतदार नोंदणी केली जाणार आहे.

पदवीधर मतदारसंघांसाठी, त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ च्या किमान ३ वर्षे आधी भारतातील मान्यतापात्र विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १८ भरून त्यासोबत निवासाचा आणि पदवीचा पुरावा जोडावा लागेल. पदवीचा पुरावा म्हणून पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकाही ग्राह्य धरली जाईल, असेही देशपांडे यांनी सांगितले.

शिक्षक मतदारसंघासाठी त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण निवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १९ भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र  द्यावे लागणार आहे.

मतदारांच्या नावात बदल झाले असतील, तर अर्जासोबत राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा संबंधित कायदेशीर पुरावादेखील जोडावा लागेल. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जाणार नाही, असेही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजकीय पक्ष देखील मतदार नोंदणीसाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज स्वतः छापून, त्याचे वितरण करू शकतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने पदवीधर आणि शिक्षक मतदारांची अधिकाधिक नोंदणी व्हावी, यासाठी जनजागृती केली जात आहे.  विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, विविध संस्था संघटना, शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका या ठिकाणी पोहोचून पदवीधरांना नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज दिले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. राजकीय पक्षांनीही मतदार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्यास्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहनही देशपांडे यांनी केले.

या मतदार नोंदणीसाठी येत्या शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईल, वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरला, द्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्र. १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai: आता मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी पाळावे लागतील काही नियम व अटी; सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने जारी केल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना)

यासोबतच, विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – २०२४ अंतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि. १७ ऑक्टोबर ऐवजी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली .

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement