Maharashtra MLC Election 2020: उर्मिला मातोंडकर शिवसेना कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याची चर्चा
परंतू, विधानपरिषदेत आपल्याला स्वारस्य नसल्याचे उर्मिला यांनी काँग्रेसला कळवल्याचे समजते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्वत: उर्मिला यांना फोन केल्याच्या वृत्ताने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
राज्यात सत्तेवर असलेले महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचे सख्य आता महाराष्ट्राला ठाऊक झाले आहे. त्यामुळे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या 12 नावांवर शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP आणि काँग्रेस (Congress) हे तिन्ही पक्ष जोरदार खल करताना दिसत आहेत. त्यामुळे दररोज नवी नावे चर्चेत येत आहेत. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांचे नाव चर्चेत आहे. पण हे नाव काँग्रेस पक्षासाठी नव्हे बरं का! हे नाव शिवसेना पक्षासाठी चर्चेत आहे. होय, स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच उर्मिला यांना फोन केल्याची चर्चा आहे. शिवसेना अथवा उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मात्र याबाबत अधिकृत माहिती पुढे आली नाही.
विधानपरीषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून उर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आले होते. परंतू, विधानपरिषदेत आपल्याला स्वारस्य नसल्याचे उर्मिला यांनी काँग्रेसला कळवल्याचे समजते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्वत: उर्मिला यांना फोन केल्याच्या वृत्ताने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एबीपी माझाया या वृत्तवाहीनीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, 'उर्मिला मातोंडकर यांच्याबाबत प्रसारमाध्यमातून मिही चर्चा ऐकतो आहे. परंतू , त्याबाबत मला माहिती नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे ठरवण्याचे सर्वाधिकार कॅबिनेटला असतात. कॅबिनेटने हे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत', असे राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी प्रस्ताव मंजूर पण नावे अद्यापही गुलदस्त्यात)
काही काळापूर्वी अभिनेत्री कंगना रनौत हिने महाराष्ट्र, मुंबई, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तीव्र परंतू संयत भाषेत कंगना रनौत हिचा समाचार घेतला होता. त्यातच उर्मिला मातोंडकर यांचा मराठी चेहरा, बॉलिवूडमधील वलय या गोष्टी पाहता उर्मिला यांना शिवसेना संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.