Maharashtra MLC Election 2020: उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार? काँग्रेस पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता
मातोंडकर या प्रामुख्याने बॉलिवूड अभिनेत्री राहिल्या आहेत. आजही त्यांची ओळक अभिनेत्री अशीच आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस तिकीटावर निवडणूक लढवली होती
राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून (Congress Party) मातोंडकर यांना विधानपरिषदेवर (Legislative Council) राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून पाठवले जाऊ शकते. स्वत:उर्मिला मातोंडकर अथवा काँग्रेस पक्ष यांच्याकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतू, प्रसारमाध्यमांतून मातोंडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्याच्या विधानपरिषदेत प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारच्या हालचाली सुरु आहेत. महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या उद्या (गुरुवार, 29 ऑक्टोबर) पार पडणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
एक बहुआयामी व्यक्तीमत्व अशी मातोंडकर यांची ओळख आहे. मातोंडकर या प्रामुख्याने बॉलिवूड अभिनेत्री राहिल्या आहेत. आजही त्यांची ओळक अभिनेत्री अशीच आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस तिकीटावर निवडणूक लढवली होती. गोपाळ शेट्टी या भाजप उमेदवाराच्या त्या प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना यश मिळू शकले नाही. त्यानंतर काही काळांनी त्यानी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक चेहऱ्यांनी राज्यपाल नियुक्त जागांसाठी आपापल्या नेतृत्वाकडे दावा सांगितला आहे. परंतू, गेल्या काही काळात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आणि राज्य सरकारचे संबंध पाहता राज्यपाल बरेचसे निकष आणि आपली सदसदविवेकबुद्धी वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निकषात बसणारी नावे आणि आपल्या कार्यकर्त्यांचे समाधान अशी दुहेरी कसरत महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षांना घ्यावी लागणार आहे. (हेही वाचा, उर्मिला मातोंडकर राजकारणात कशा आल्या? त्यांनी काँग्रेस पक्षच का स्वीकारला?)
दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्यासोबतच सचिन सावंत (प्रवक्ते), सत्यजित तांबे (युवक काँग्रेस अध्यक्ष), मोहन जोशी, नसीम खान यांच्या नावांची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ खडसे (नुकताच पक्षप्रवेश), राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), श्रीराम शेटे, आनंद शिंदे (गायक), उत्तमराव जानकर, आदिती नलावडे, शिवाजी गर्जे आणि शिवसेनेकडून सुनिल शिंदे (माजी आमदार) सचिन अहिर (माजी मंत्री) मिलिंद नार्वेकर(पक्ष सचिव) राहुल कनाल (युवा सेना), विजय आप्पा करंजकर ( जिल्हाप्रमुख ), भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख, नाशिक), नितिन बानगुडे पाटील (उपनेते), अर्जुन खोतकर (माजी मंत्री) यांच्या नावांची चर्चा आहे. परंतू, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांकडून मात्र कोणत्याच नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली नाही.