Lockdown in Maharashtra: राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत पुन्हा वाढ? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय
त्यामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले. मात्र या निर्बंधांच्या कालावधीत पुन्हा वाढ होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
राज्यात मागील महिन्यात कोविड-19 (Covid-19) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. मात्र आता रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये पुन्हा वाढ होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. याबाबतचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. आजच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधी संबंधी निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 5 एप्रिल 2021 पासून ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर 14 एप्रिल पासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले. पूर्वी 1 मे पर्यंत लागू करण्यात आलेल्य निर्बंधांच्या कालावधीत 15 मे पर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे निर्बंधांचा कालावधी पुन्हा वाढणार का? असा प्रश्न जनतेसमोर आहे. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
कोविड निर्बंधांमुळे राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे. राज्यभर संचारबंदी असून सकाळी केवळ 7-11 यावेळेतच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. दरम्यान, लॉकडाऊनबाबत 15 मे नंतरच निर्णय होईल, असे यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर तो जाहीर करण्यात येईल.
कालच्या अपडेटनुसार, राज्यात 40,956 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 793 जणांचा मृत्यू झाला आहे. 71,966 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या राज्यात 5,58,996 सक्रीय रुग्ण आहेत.