Maharashtra Legislature Winter Session 2020: महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु, मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी ठरणार कळीचे मुद्दे
या अधिवेशनात एकूण १० विधेयके आणि ६ अध्यादेश मांडण्यात येतील. यात प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला आळा घालण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या शक्ती कायद्याचे विधेयकाचाही समावेश आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 (Maharashtra Legislature Winter Session 2020 ) आजपासून (सोमवार, 14 डिसेंबर 2020) सुरु होत आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन केवळ दोनच दिवस चालणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus ) संकटाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करुन तो दोन दिवस इतका करण्यात आला आहे. आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधक असासामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण, मराठा आरक्षण (Maratha Reservation), कोरोना ते शेतकरी यांसह इतरही विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी (रविवार, 13 डिसेंबर 2020) विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलाच सामना पाहायला मिळाला. सुरुवातीला विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. तर त्याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकासआघाडीतील इतर मंत्र्यांच्या उपस्थितत झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray: सरकार पाडण्याचा मुहूर्त काढण्यात विरोधकांचे वर्ष गेले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जहरी टीका)
परंपरेनुसार राज्य विधिमंडळाच्या पूरवसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. तसेच, राज्य सरकारवर टीका करत सरकार जनतेच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा करण्याऐवजी याहीवेळी वेळ मारुन नेईल. चर्चेत अडथळा आणण्यासाठी सभागृहात गोंधळ करेन असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. यावर महाविकासआघाडी सरकारनेही तसेच प्रत्युत्तर विरोधकांना दिले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे केवळ दोनच दिवस चालणारे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात एकूण १० विधेयके आणि ६ अध्यादेश मांडण्यात येतील. यात प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला आळा घालण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या शक्ती कायद्याचे विधेयकाचाही समावेश आहे. याशिवाय इतरही विधेयक चर्चेला येतील. दरम्यान, अधिवेशनात सुरुवातील शोकप्रस्ताव आणि त्यानंतर पुरवणी विधेयकं पटलावर मांडण्यात येतील
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात 10 विधेयकं आणि 6 अध्यादेश येणार आहेत. त्याचबरोबर आज शोक प्रस्ताव, पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी बनवण्यात आलेलं शक्ती विधेयकही आज विधिमंडळात मांडले जाण्याची शक्यता आहे.