विधान परिषद निवडणूक 2020: कोण आहेत रमेश कराड? भाजपने अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी का दिली?
ही नाराजी केवळ नेत्यांमध्येच नव्हती तर कार्यकर्त्यांमध्येही होती. या नाराजीचे रुपांत मोठ्या लाटेत होण्याआधीच पक्षाला काहीतरी निर्णय घेणे महत्त्वाचे होते. त्यामुळेच भाजपने ऐनवेळी निर्णय बदलल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Maharashtra Legislative Council Election 2020: विधान परिषद निवडणूक 2020 मध्ये भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला. डॉ. अजित गोपछडे यांचा अर्ज मागे घेतला आणि लातूरचे रमेश कराड (Ramesh Karad) यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला. रमेश कराड हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि गोपिनाथ मुंडे गटाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. भाजपने तत्पूर्वी प्रविण दटके (Pravin Datke), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), अजित गोपछडे (Ajit Gopchade) आणि रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांची नावे जाहीर केली. त्यांचे निवडणूक अर्जही दाखल केले. मात्र, आयत्या वेळी भाजपने एका उमेदवारात बदल केला. या बदलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांना धक्का देत चार नवे चेहरे रिंगणात उतरवले. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse), पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासारख्या जेष्ठ भाजप नेत्यांमध्ये मोठी नाराजी होती. ही नाराजी केवळ नेत्यांमध्येच नव्हती तर कार्यकर्त्यांमध्येही होती. या नाराजीचे रुपांत मोठ्या लाटेत होण्याआधीच पक्षाला काहीतरी निर्णय घेणे महत्त्वाचे होते. त्यामुळेच भाजपने ऐनवेळी निर्णय बदलल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
रमेश कराड यांच्याबाबत बोलायचे तर गेली अनेक वर्षे ते भाजपचे कार्यकर्ते, नेते राहिले आहेत. त्यांना आमदार होण्याची महात्वाकांक्षा पहिल्यापासूनच होती. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये आपला विचार होत नाही हे पाहून मधल्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सानिध्यात गेले. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशही केला. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषद उमेदवारी दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी विधान परिषदेकडून राष्ट्रवादीसाठी अर्जही दाखल केला. त्यानंतर भाजपच्या गोटातून नाट्यमयरित्या सूत्रे हालली. कराड यांनी ऐनवेळी घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. हे सगळे अवघ्या पाच दिवसात घडले. कराड यांच्या निर्णय फिरवण्यामुळे राष्ट्रवादी तोंडावर पडला. कराड यांनी ऐनवेळी अवसानघातकीपणा केल्याने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती. (हेही वाचा, विधान परिषद निवडणूक 2020 : भाजपने उमेदवार बदलला; पंकजा मुंडे गटाच्या रमेश कराड यांना संधी)
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप नेतृत्वाने कराड यांना उमेदवारीच्या तयारीला लागण्यास सांगितले. त्यानुसार कराड यांनी लातूर ग्रामिण विधानसभा मतदारसंघातून तयारी केली. मात्र, शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेला सोडला. आता मतदारसंघच वाट्याला नाही म्हटल्यावर कराड यांच्या उमदेवारीचा प्रश्नच निकाली निघाला होता. त्यामुळे रमेश कराड, त्यांचा वंजारी समाज आणि त्यांना माणणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले. त्याचा परिणाम भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत आंदोलन केले. या मतदारसंघातून जवळपास 25 हजार मतदारांनी 'नोटा' हा पर्याय वापरला. विधानसभा निवडणुकीतही कराड कोठेच दिसले नाहीत. त्यामुळे पक्षाने या वेळी कराड यांची स्वत:ची आणि पंकजा मुंडे यांच्यासहीत असंख्य कार्यकर्ते आणि ज्येष्ठांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.