Maharashtra Karnataka Bus सेवा पूर्ववत, बेळगाव बस पुण्याच्या दिशेने रवाना; कोल्हापूर थांबा मात्र टाळला
कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही बाजूंच्या परीवहन महामंडळांनी परस्परांच्या राज्यांमध्ये गाड्या सोडल्या आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात (Maharashtra Karnataka Border) सुरु असलेल्या संघर्षामुळे स्थगित करण्यात आलेली बस (Maharashtra Karnataka Bus) सेवा पुन्हा सुरु झाली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही बाजूंच्या परीवहन महामंडळांनी परस्परांच्या राज्यांमध्ये गाड्या सोडल्या आहेत. कर्नाटक महामंडळाची बस बेळगाव (Belgaon) डेपोहून पुण्याच्या (Pune) दिशेने रवाना झाली आहे. सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यांतील बससेवा स्थगित करण्यात आली. काही काळानंतर ही बससेवा सुरु झाली. सीमवादादरम्यान, काही अनुचित प्रकार घडल्यास प्रामुख्याने सरकारी वाहने लक्ष्य केली जातात. त्यातही एसटी बसेस मोठ्या प्रमामावर लक्ष्य होतात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हा निर्णय घेण्यता आला.
कोल्हापूर प्रवेश टाळला
दरम्यान, बेळगावहून ही बस पुण्याच्या दिशेने दाखल होत असली तरी ती कोल्हापूरला जाणार नाही. सीमावादाचे पडसाद सर्वात प्रथम कोल्हापूरमध्ये उमटतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बेळगावहून निगालेली बस कोल्हापूरला दाखल होणार नाही. ही बस कोल्हापूर बायपासमार्गे पुढे सातारा स्थानकात दाखल होईल आणि त्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. (हेही वाचा, Section 144 in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढचे 15 दिवस जमावबंदी आदेश लागू; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिक तीव्र)
दरम्यान, बससेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बस सेवा अचानक स्थगित झाल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला होता. बस सेवा स्थगित झाली तर त्याचा प्रवाशांना नाहक फटका बसतो. त्यांना खासगी वाहतूकीस प्राधान्य द्यावे लागते. शिवाय, वाहतूकीपोटी पैसेही अधिक खर्च होतात.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले. बेळगाव, कारवार आणि बिदर, भालकी या गावांवरुन सीमावाद सुरु असतानाच बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा सांगितला. परिणामी राज्यातील वातावरण जोरदार तापले. त्यातच कर्नाटकमधील कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यककर्त्यांनी केलेल्या आंदोलनावेळी महाराष्टाच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. परिणामी दोन्ही राज्यांनी बस सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी महाराष्ट्राच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली होती. त्यांना आजची वेळ मिळाली असून हे खासदार पंतप्रधानांना आज भेटणार आहेत. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपालांची वक्तवे आणि भाजप नेत्यांकडून झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमना या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पंतप्रधान दोन्ही राज्यांच्या खासदारांशीही चर्चा करणार असल्याचे समजते.