Maharashtra Hospital Audit: नाशिक आणि विरार येथील दुर्घटनेनंतर राज्यातील 1814 रुग्णालयांचे ऑडिट; समोर आली धक्कादायक माहिती

काही रुग्णालयांमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर्सजवळ ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन पाईपमधील लीकेजचे प्रमाण कमी झाल्यास मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन वाचवण्यामध्ये यश मिळेल

Medical workers (Photo Credits: IANS)

सध्याच्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या काळात महाराष्ट्रातील रुग्णालयांची दुरवस्था अधोरेखित करणारा एक अहवाल समोर आला आहे. राज्यातील 1814 रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले. या अहवालानुसार रुग्णालयांमध्ये अनेक बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. सरकारी असो किंवा खासगी सर्व रुग्णालये एकसारखीच असल्याचे आढळले आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईपासून अगदी नंदुरबारपर्यंत परिस्थिती सारखीच होती. तज्ज्ञांनी आपल्या अहवालात सांगितले आहे की, राज्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेच्या देखभालीबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

गेल्या महिन्यात नाशिक आणि विरारमधील रुग्णालयांमध्ये झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व रुग्णालयांचे अग्निशामक व ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. टीम्सद्वारे 9 मे पर्यंत 335 शासकीय आणि 1,479 खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. 1,719 रूग्णालयातील अहवाल सादर करण्यात आले आहेत. या ऑडीटमध्ये, पथकांनी प्रामुख्याने ऑक्सिजन सिलिंडरचा साठा आणि त्यांची सुरक्षा, वेंटिलेटरची देखभाल, आपत्कालीन उपाय आणि कुशल मनुष्यबळ यावर लक्ष केंद्रित केले.

मिड-डेच्या वृत्तानुसार, तज्ञांना काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर्स उघडीच असलेले आढळले, तर काही ठिकाणी पाईप्स लीक झाल्या होत्या. रुग्णालयात, जेव्हा परिस्थिती बिघडेल किंवा मशीन थांबेल त्यावेळी कोणतीही बॅकअप सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये गोष्टी खराब झाल्यास त्या ठीक करण्यासाठी मूलभूत साधनेदेखील नव्हती. त्याशिवाय ही यंत्रणा मेंटेन करण्यासाठी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित कर्मचारीदेखील नव्हते. अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने ठेवले गेले होते.

अनेक रुग्णालयांमध्ये तज्ञांना आढळले की, अग्निसुरक्षेबाबतचे ऑडिटदेखील झाले नाही. काही रुग्णालयांमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर्सजवळ ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात आले होते. ऑक्सिजन पाईपमधील लीकेजचे प्रमाण कमी झाल्यास मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन वाचवण्यामध्ये यश मिळेल असे मत पथकाने व्यक्त केले. ऑक्सिजन ऑडिट पॅरा मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावून समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यास सांगितले.