Rajesh Tope on New COVID 19 Restrictions In Maharashtra: कोरोना निर्बंध अजून कडक करण्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा; पहा काय म्हणाले
यासाठी टास्क फोर्सचं मत विचारात घेतलं जाईल असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिका, युरोपीय देशांसोबतच आता भारतामध्येही ओमिक्रॉनची (Omicron) चिंता वाढत आहे. मागील सात दिवसांत झपाट्याने वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या पाहता आता प्रशासन पुन्हा अलर्ट मोड वर येऊन कामाला लागलं आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या असल्याने आता महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि बीएमसीकडून (BMC) निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीने पाऊलं टाकली जात आहेत. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेत माहिती दिलेली आहे.
राजेश टोपे यांनी मुंबई मध्ये पॉझिटिव्हिटी रेट 4% असल्याचं सांगताना ही चिंताजनक बाब असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये नागरिकांनी आता लग्नसोहळे, पार्ट्यांमध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. या मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये सर्रास नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं सांगताना त्यांनी आता यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाला विशेष नियमावली बनवावी लागणार असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंट सौम्य समजू नका, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांची प्रतिक्रिया .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत वाढत सलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांची अजून एक बैठक होणार असून निर्बंध वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचं मत विचारात घेतलं जाईल असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
भारतामध्ये 3 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांसाठी लस तर 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असणार्यांसाठी तिसरा कोविड 19 लसीचा डोस दिला जाणार आहे. लहान मुलांना केवळ कोवॅक्सिन लस दिली जाईल असं देखील सांगण्यात आले आहे.