महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवी मुंबई, उल्हासनगर व मीरा भाईंदर मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली
याच्या उपययोजनेबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहेच, मात्र प्रत्येक महानगरपालिका आणि तिथल्या आयुक्तांच्या खांद्यावरही याची जबाबदारी आहे. अशात काही आठवड्यांपूर्वी मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांची बदली करण्यात आली होती.
सध्या राज्यात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. याच्या उपययोजनेबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहेच, मात्र प्रत्येक महानगरपालिका आणि तिथल्या आयुक्तांच्या खांद्यावरही याची जबाबदारी आहे. अशात काही आठवड्यांपूर्वी मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांची बदली करण्यात आली होती. आता राज्य सरकारने पुन्हा एकदा तडकाफडकी निर्णय घेत, राज्यातील नवी मुंबई (Navi Mumbai), उल्हासनगर (Ulhasnagar) व मीरा भाईंदर (Mira Bhayandar) महापालिका आयुक्तांची बदली केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संक्रमितांची वाढती संख्या हे या बदलीमागील करण असल्याचे चर्चा सध्या रंगत आहे.
श्री अभिजित बांगर (Abhijit Bangar), आयएएस (2008) हेअतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर येथे कार्यरत होते, आता त्यांची नवी मुंबई महानगरपालिका, आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.मंतादा राजा दयानिधी (Dr.Mantada Raja Dayanidhi), आयएएस (2014), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांना, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. डॉ. विजय राठोड (Dr. Vijay Rathod), आयएएस (2014) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांची, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
गेल्या आठवड्यात सरकारने कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून पंकज आशिया यांची नेमणूक केली होती. आताच्या या तीन बदल्यांच्या मागेही कोरोना विषाणूची वाढती संख्या हे कारण असण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांचीही नागपूर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. मात्र कोरोना संकटकाळात मुंढे यांचे नागपुरातील काम पाहून सर्वजणच अचंबित झाले आहे. (हेही वाचा: माझे मुख्यमंत्रीपद गेले, यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य)
दरम्यान, राज्यात काल (22 जून) दिवसभरात 3721 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, दिवसभरात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1962 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,35,796 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत राज्यात 67,706 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य स्थितीत 61,793 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.