Samruddhi Mahamarg वर राज्य सरकार आता सुरू करणार Air Ambulance !
सरकार कडून काही हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.
मुंबई-नागपूर प्रवास वेगवान व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) कडे पाहिलं जात आहे. परंतू या महामार्गाच्या उद्घटनापासूनच त्यावरील अपघाताची मालिका बघून आता अनेक जण तो टाळत आहे. काही दिवसांपूर्वी या महामार्गावर बुलढाणा नजिक एक भीषण अपघात झाला होता. खाजगी बस पलटी होऊन पेटली आणि त्यामध्ये 25 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या महामार्गावरील वाढते अपघात पाहता आता राज्य सरकार ठोस पावलं उचलताना दिसत आहेत. या महामार्गावर आता एअर एम्ब्युलंस (Air Ambulance) सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका पाहता त्यानंतर तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने आता एअर एम्ब्युलंसचा पर्याय सरकार आजमावून पाहणार आहे. सरकार कडून काही हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई-नागपूर दरम्यान महत्त्वाच्या हॉस्पिटल सोबतही सरकार करार करण्याचा विचार करत असल्याचं समोर येत आहे.
अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी एअर अॅंम्बुलन्स आणि हॉस्पिटलची सेवा मिळावा यासाठी राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची एक घटना ताजी आहे. यामध्ये जीवितहानीचं वृत्त समोर आलेलं नाही परंतू 20 जण जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. Mumbai-Nagpur Super Expressway: मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे बनला ‘मृत्यूचा सापळा’; पाच महिन्यात तब्बल 95 लोकांनी गमावले आपले प्राण .
समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहेत? याची अनेक कारणं समोर आली आहेत. बुलढाणा जवळ झालेल्या अपघातानंतर या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी ठोस उपायांची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं होतं. मात्र तोपर्यंत ह्युमन इंटरवेंशन करून चालकाला सतर्क ठेवलं जाईल असंही म्हटलं आहे.