Coronavirus Lockdown काळात महाराष्ट्र शासनाने हाऊसिंग सोसायट्यांसाठी जारी केली खास नियमावली

लॉकडाऊन कालावधीत आवश्यक नसल्यास रहिवाशांनी घरातून बाहेर पडू नये याची जबाबदारी हाऊसिंग सोयायटी कमिटीवर सोपवण्यात आली आहे.

Visitors being screened for coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

लॉकडाऊनचे (Lockdown) नियम धाब्यावर बसवून लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र सरकारने हाऊसिंग सोयायटी कमिटीची (Committees of Housing Societies) मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन कालावधीत आवश्यक नसल्यास रहिवाशांनी घरातून बाहेर पडू नये याची जबाबदारी हाऊसिंग सोयायटी कमिटीवर सोपवण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोऑपरेटीव्ह सोयायटीचे जिल्हा उपनिबंधक यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना काही नियमांचे पालन करण्याचे आदेश (Deputy District Registrar of Cooperative Societies) दिले आहेत. यात रहिवाशांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करु नये याची सविस्तर यादी बनवण्यात आली आहे.

प्रत्येक सोसायटीच्या गेटवर हात धुण्यासाठी साबण, पाणी आणि सॅनिटायझरची सोय करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. किराणा आणि इतर सामानाची मागणी इंटरकॉमवरुन करावी. तसंच सामान जवळच्या किराणा दुकानातूनच मागवावे. मागवण्यात आलेले सामान सोसायटीच्या गेटवर डिलिव्हर करण्यात येईल. त्यानंतर सोयायटीचे सेक्रेटरी ते सामान संबंधित घरात पोहचवतील किंवा कुटुंबातील एका सदस्याने जावून ते सामान गेटवरुन घेऊन यावे. काही कारणास्तव सामानाची विभागणी गेटवर करण्यात आल्यास स्वच्छतेचे नियम पाळण्यात यावेत, असे नियम करण्यात आले आहेत. (कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर वांद्रे पश्चिम विभागात नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला खरेदी करता येणार, पहा वेळापत्रक)

एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी शेजाऱ्यांकडून घेण्यात येईल असा नियम अनेक सोसायट्यांमध्ये करण्यात आला आहे. ड्रायव्हर्स, मोलकरणी, पेपरवाला यांना सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. तसंच सोसायट्यांच्या क्लबहाऊस, गार्डनमध्ये नागरिक आणि लहान मुलांची गर्दी होणार नाही याचीही काळजी सोसायटी कमिटीकडून घेतली जात आहे. विशेष म्हणजे अनके सोसायट्यांमध्ये क्लबहाऊस, गार्डन्स बंद ठेवण्यात आली आहेत.

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 1000 च्या पार गेला असून त्यापैकी 96 रुग्ण उपचारानंतर पूर्णतः बरे झाले आहेत. तर 29 जणांचा यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.