अरेरे धक्कादायकच! ...अन अजित पवार स्वत:च फुटले
जर कोणी फुटलाच तर आम्ही एकास एक उमेदवार देऊन आणि भाजप उमेदवाराचा पराभव करु. असे असताना कोणता माय का लाल फुटतो तेच पाहायचे आहे', असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते.
Maharashtra Government Formation: राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, अजित पवार यांनी हे पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडिया आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्याच एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमिवर पक्षाचे आमदार फुटू शकतात असे विचारले असता 'राष्ट्रवादी काँग्रेसचाच काय काँग्रेस आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा एकही आमदार फुटला नाही. जर कोणी फुटलाच तर आम्ही एकास एक उमेदवार देऊन आणि भाजप उमेदवाराचा पराभव करु. असे असताना कोणता माय का लाल फुटतो तेच पाहायचे आहे', असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते.
अजित पवार यांच्या विधानावरुनस सोशल मीडियातही जोरदार खिल्ली उडवली जात आहे. अजित पवार यांनी आमदार फुटू नये यासाठी इतरांना धमकी दिली आणि स्वत: अजित पवारच फुटले, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होताना दिसत आहे. पक्षाला आणि कार्यकर्त्यांना अंधारात ठेऊन थेट असा निर्णय घेतला यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, काँग्रेस पक्षातही जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. पवार यांनी पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला अशी भावनाही व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?.
'कुठलाही आमदार आपला पक्ष सोडून जाणार नाही. कुणी तशी हिंमत केलीच तर सर्व पक्ष त्याच्यासमोर एकच उमेदवार देतील आणि त्याला पाडतील. सर्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात कुठलाही 'माई का लाल' पुन्हा आमदार म्हणून निवडून येणार नाही.' अजित पवार यांच्या या निर्णयानंतर नेमकं हेच वक्तव्य आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आले आहे. (हेही वाचा, शेतकरी हितासाठी पाच वर्षे स्थिर सरकार देऊ: देवेंद्र फडणवीस)
विधानसभा निवडणूक प्रचारावेळी भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी यांच्यात प्रचंड संघर्ष झाला. हा संघर्ष विधानसभा निवडणुकीनंतरही कायम राहिला. मात्र, निवडणूक निकालानंतर या संघर्षाला सत्तासंघर्षाची किनार होती.मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समसमान वाटप या मुद्यावरुन शिवसेना भाजप यांच्यातील सत्तासंघर्ष वाढला. पुढे हा सत्तासंघर्ष टोकाला जाऊन तुटला आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी आघाडी उदयास येत राज्यावर सत्तास्थापना होणार असे जवळपास नक्की झाले. मात्र, तोपर्यंतच अजित पवार यांनी राजभवनावर जात उपमुख्यमंत्री पदाची शपथच घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली.