Maharashtra Government Employee DA Hike: शिंदे सरकार कडून राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ जाहीर
राज्यातील 17 लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्तातील वाढीचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकार पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य सरकार (Maharashtra Government) कडूनही त्यांच्या सरकारी कर्मचार्यांना डीए (DA) मध्ये वाढ घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून 4% डीए वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता 38 वरून 42% झाला आहे. हा महागाई भत्ता कर्मचार्यांना 1 जानेवारी ते 31 मे दरम्यानचा असून तो जूनच्या वेतनामध्ये रोखीने दिला जाणार आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकारी कर्मचार्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारी कर्मचार्यांनी शासनाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेऊन विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये महागाई भत्त्याचा देखील विषय होता. सरकारी कर्मचार्यांना वर्षातून 2 वेळेस महागाई भत्ता दिला जातो. नुकतीच राज्याच्या अर्थ विभागाने निर्णय काढत डीए मध्ये वाढ जाहीर केली आहे. आता महागाई भत्ता 38 वरून 42% केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारी कर्माचार्यांचाही डीए 42% करण्यात आला आहे. 3 एप्रिल 2023 दिवशी त्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता शिंदे सरकारने कर्मचार्यांना डीए वाढीचं गिफ्ट देऊन खूष केलं आहे. नुकतीच शिंदे सरकारची वर्षपूर्ती देखील झाली आहे. नक्की वाचा: ST Mahamandal: आता बस स्थानकांवर सुरु होणार मिनी थिएटर, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक; एसटीचा चेहरा मोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न .
महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मागील 5 महिन्यांची थकबाकीही रोखीने दिली जाणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवार (30 जून) दिवशी जारी केला आहे. राज्यातील 17 लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्तातील वाढीचा लाभ मिळणार आहे.