Unlock 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील; दुकानं, जीम, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यांसदर्भात नवी नियमावली जारी

यानुसार टप्प्यांनी लॉकडाऊन उठवण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीत दुकाने, जीम, गार्डन्स, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

Lockdown 4 Guidelines (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनलॉक 1 (Unlock 1) अंतर्गत विविध सेवा-सुविधा सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधत अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या. दरम्यान 2 जून पासून काही बाबतीत मुभा देण्यात येणार होती. मात्र त्याला निसर्ग चक्रीवादाळामुळे ब्रेक लागला. दरम्यान महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन शिथिलीकरणाबाबत नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन उठवण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीत दुकाने, जीम, गार्डन्स, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. (महाराष्ट्रात एकूण 74 हजार 860 कोरोनाबाधित; दिवसभरात 2 हजार 560 रुग्णांची वाढ तर, 122 जणांचा मृत्यू)

नव्या नियमावलीनुसार, जीम, गार्डन आणि मैदाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने आलटून पालटून खुली करण्यास परवानगी मिळाली आहे. पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी शॉप ओनर असोशिएशन सोबत चर्चा करुन दुकाने खुली करण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले आहे. तसंच खाजगी कार्यालये 10% कर्मचाऱ्यांच्या आधारे सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, सर्व कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टिसिंग आणि स्वच्छतेचे नियम पाळणे अनिवार्य आहे. वर्तमानपत्र छपाई आणि वाटप यांना परवानगी देण्यात आली असून वर्तमानपत्राचे वाटप करणाऱ्यांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये उत्तरपत्रिका तपासणे आणि ई-कन्टेंट तयार करणे या कामांसाठी शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नव्या नियमावलीत आंतरजिल्हा आणि आंतरराज्य ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे.

CMO Maharashtra Tweet:

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरीत मजूरांना स्वगृही परतण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरु  करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातही मजूरांना इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम असेच सुरु राहील, असेही या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 74860 वर पोहचला असून 2587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 39935 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु असून 32329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.