महाराष्ट्रात तब्बल 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यांत गंभीर परिस्थिती
यापैकी 112 तालुक्यांत गंभीर आणि 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून, त्या संदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महाराष्ट्रातल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर जाहीर करण्यात आला आहे. यापैकी 112 तालुक्यांत गंभीर आणि 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. जनता दुष्काळाने होरपळत असल्याने विरोधकांकडूनही सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना राज्याचा दौरा करून दुष्काळ परिस्थितीचा अहवाल देण्याचे काम सोपवले होते. याप्रमाणे हवाल सादर झाल्यानंतर राज्यात 151 तालुक्यांत आता दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
हा दुष्काळ राज्यातील 26 जिल्ह्यात जाहीर केला गेला असून, जळगाव, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांत सर्वाधिक दुष्काळी तालुके आहेत. 31 ऑक्टोबर 2018 म्हणजेच आजपासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दुष्काळी तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.