Ashok Chavan Recovers From COVID19: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन

सर्वसामन्यांपासून ते राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारही कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत.

Ashok Chavan | (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. सर्वसामन्यांपासून ते राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारही कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यातच काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अशोक चव्हाण यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील (Mumbai) एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता अशोक चव्हाण हे मुंबईतील घरी 14 दिवस क्वारंटाईन असणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या कोरोनामुक्त झालेली बातमी कानावर पडताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण हे विधानपरिषद निवडणुकीसाठी मुंबईला गेले होते. याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. या निवडणुकीनंतर नांदेडला गेल्यानंतर ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळे ठेवले होते. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रिपोर्टनंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर 10 दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. याआधी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु, त्यांनीही कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसमोर कोरोनाबाबत आपला अनुभव सांगितला होता. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra Update: महाराष्ट्रात एकूण 74 हजार 860 कोरोनाबाधित; दिवसभरात 2 हजार 560 रुग्णांची वाढ तर, 122 जणांचा मृत्यू

पीटीआय ट्वीट-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात आतापर्यंत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी 2 हजार 560 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 122 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 860 वर पोहचली आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.