Maharashtra Floods: भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून NDRF ने बाहेर काढले 52 मृतदेह; 1,800 लोकांची सुटका
महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे (Heavy Rains) मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) ने आतापर्यंत अडकलेल्या 1,800 लोकांची सुटका केली आहे आणि महाराष्ट्रातील 87 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
यासोबतच एनडीआरएफच्या पथकांनी महाराष्ट्रातील भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून 52 मृतदेह बाहेर काढले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात शोध सुरू असल्याचे एनडीआरएफने एका निवेदनात म्हटले आहे. देशाच्या अनेक भागातील पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी एनडीआरएफची एकूण 149 पथके तैनात करण्यात आली आहेत.
1 जूनपासून रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 291 मिमी पावसाची नोंद झाली असून, चिपळूणमधील 5 हजार आणि खेडमधील 2 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल आणि नेव्ही टीम आणि स्थानिक एजन्सीसमवेत बाधित भागात बचाव व मदत कार्य सुरु आहे. 505 लोकांना 10 वेगवेगळ्या निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यात प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.