Maharashtra Floods: महाराष्ट्रात पुरामुळे तब्बल 4000 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज, 209 जणांचा मृत्यू; NCP करणार 16,000 कुटुंबांना मदत
आतापर्यंत 3.3 लाख हेक्टर शेती क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. रस्ते, पूल, शालेय इमारती, वीज अशा पायाभूत सुविधा तसेच पाणीपुरवठा योजना अशा सरकारी सुविधांचे नुकसान झाले आहे
सध्या राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात महापूर (Flood) आला आहे. या महापुरामुळे राज्याचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 3,700 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. आता केंद्राने मंगळवारी 700 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. दुसरीकडे यंदाच्या पुरामुळे नुकसानीचा प्राथमिक अंदाज 4000 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राथमिक सुविधांचे नुकसान झाले आहे.
यासह पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत राज्यातील 209 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर 25 हजाराहून अधिक जनावरे दगावली आहेत. राज्य मंत्रिमंडळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागासाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज जाहीर करेल. ही भरपाई निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळादरम्यान जाहीर केलेल्या मदतीच्या धर्तीवर होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांची भेट घेऊन नुकसान भरपाईच्या पॅकेजवर चर्चा केली आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव बुधवारी राज्य मंत्रिमंडळात मांडला जाईल.
राज्य सरकार बाधित व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना दिलासा देण्याच्या विचारात आहे. चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी निधी मंजूर झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी पावसासंबंधित दुर्घटनांमध्ये कोकणातील मृतांचा आकडा 150 वर पोहोचला. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील पोसरे खुर्द भूस्खलनाच्या ठिकाणी मंगळवारी बचावकार्य थांबवण्यात आले मात्र त्याठिकाणी अजूनही आठ जण बेपत्ता आहेत. सुरक्षित स्थलांतर झालेल्या नागरिकांची संख्या जवळपास 4 लाख 34 हजार इतकी आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित जिल्ह्यांमधील नुकसानीचा अंदाज वाढू लागला आहे. आतापर्यंत 3.3 लाख हेक्टर शेती क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. रस्ते, पूल, शालेय इमारती, वीज अशा पायाभूत सुविधा तसेच पाणीपुरवठा योजना अशा सरकारी सुविधांचे नुकसान झाले आहे. सांगली व कोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यांमधील 96,000 हेक्टर शेतीजमीनीच्या नुकसानीचा अंदाज 700 कोटी रुपयांचा आहे. (हेही वाचा: Maharashtra Floods: वीज नसलेल्या पूरग्रस्त गावांना वितरीत केले जाणार मोफत सौर दिवे; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा)
दरम्यान, राष्ट्रवादीने (NCP) मंगळवारी पूरग्रस्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 16,000 कुटुंबांना अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील सदस्य व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, 16 हजार कुटुंबांना अडीच कोटी रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू - भांडी, कपडे, औषधे आणि खाद्य पदार्थ उपलब्ध करुन देण्याची योजना आखण्यात आली आहे.