Maharashtra Floods: वीज नसलेल्या पूरग्रस्त गावांना वितरीत केले जाणार मोफत सौर दिवे; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

पुरामुळे (Flood) ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे

Maharashtra Floods: वीज नसलेल्या पूरग्रस्त गावांना वितरीत केले जाणार मोफत सौर दिवे; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा
Maharashtra Minister Nitin Raut (Photo Credits: ANI)

पुरामुळे (Flood) ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या  रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पेण, महाड, नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

महाड तालुक्यातील वीज यंत्रणेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाड येथे सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे पडलेल्या उच्चदाब वाहिनीच्या टॉवरच्या ठिकाणी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज यंत्रणा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पूरपरिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याची पावती त्यांनी दिली.

डॉ. नितीन राऊत यांनी महाड येथील दौरादरम्यान  दिवंगत काँग्रेस नेते  माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यानंतर  ऊर्जामंत्री यांनी राजावाडी तसेच विरेश्वर गावातील बाधित झालेल्या विद्युत यंत्रणेची पाहणी केली. तसेच महापारेषण अतिउच्चदाब केंद्राची पाहणी केली.

22 जुलै रोजी सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे  उच्चदाब वाहिनीचे दोन टॉवर पडल्याने महाड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तथापि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे 26 जुलै रोजी महावितरणच्या गोरेगाव स्विचिंग उपकेंद्रातून बॅक फिडरमार्फत 22 के.व्ही. लोणेरे फिडरद्वारे 22 के.व्ही वाहूर फिडर चालू करून 80 गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू करण्यात आला असल्याचे डॉ राऊत यांनी सांगितले.

पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत. बाधित झालेल्या 1308 वितरण रोहित्रांपैकी 261 तर 471 पाणीपुरवठा योजनांपैकी 29 तर 8 कोविड हॉस्पिटल/ व्हॅक्सीनेशन सेंटरपैकी 3, तसेच 83 मोबाईल टॉवरपैकी 19 असे एकूण 35, 560 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले.

(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2021 11:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).