सर्वांनी एकत्र लाईट बंद केल्यास वीज पुरवठा यंत्रणेत बिघाडाची शक्यता लक्षात घेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवे लावण्यासाठी सुचवला 'हा' पर्याय
हा बिघाड झाल्यास पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी साधारण आठवड्याचा कालावधी जाऊ शकतो, असे महाराष्ट्र उर्जामंत्री नितिन राउत यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या व्हिडीओ द्वारे देशातील नागरिकांना उद्या, रविवारी रात्री 9 वाजता आपल्या खिडकीत किंवा बाल्कनीत एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. यावेळी सर्वांनी ठीक 9 वाजता आपल्या घरातील लाईट 9 मिनिटांसाठी बंद करावी आणि खिडकीत दिवा लावावा असे मोदी म्हणाले होते. मात्र महाराष्ट्र ऊर्जामंत्री नितीन राऊत (Maharashtra Electricity Minister Nitin Raut) यांनी यावर प्रतिक्रिया देत, जर का सर्व नागरिकांनी एकाच वेळी आपल्या घरातील लाईट्स बंद केल्या तर वीज पुरवठा केंद्रातील यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली. हा बिघाड झाल्यास पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी साधारण आठवड्याचा कालावधी जाऊ शकतो, असेही राऊत यांनी म्हंटले आहे. असे होऊ द्यायचे नसल्यास नागरिकांनी सुरक्षित पर्याय म्हणून आपल्या घरातील वीज न घालवतात आपल्या दारात किंवा खिडकीत दिवा लावावा असे राऊत यांनी सांगितले आहे.
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदींच्या दिवे लावण्याच्या विनंतीवर भाष्य केले. सर्वांनी एकत्र लाईट्स बंद केल्यास सर्व आपत्कालीन सेवांवर परिणाम होईल. आणि असे झाल्यास आठवड्याभराचा कालावधी या सेवा पूर्ववत करण्यात जाईल अशी शक्यता राऊत यांनी वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना जर का दिवे किंवा मेणबत्त्या पेटवायच्या असतील तर तसे जरूर जाणावे मात्र घरातील लाईट्स बंद करण्याची आवश्यकता नाही असे राऊत यांनी म्हंटले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी केलेल्या थाळी वाजवा टाळी वाजवा आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आताही हे दिवे लावण्याचे आवाहन करताच अनेक विरोधकांनी सुद्धा याचे स्वागत केले आहे, कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेली निराशा दूर करून मनोबल वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे ज्यात आपल्या घराच्या गॅलेरीतून किंवा दारातून दिवा प्रज्ज्वलित करायाचा आहे. यासाठी कोणीही रस्त्यावर गर्दी करुन नका असेही मोदींकडून सांगण्यात आले आहे.