Maharashtra COVID-19 Restrictions: महाराष्ट्रामध्ये Weekend Lockdown ची घोषणा; रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत लागू असेल नाईट कर्फ्यू
मिनी लॉकडाऊन आणि त्याचसोबत लसीकरण यामुळे कोरोनाची संसर्गाची साखळी तोडली जाऊ शकते अशा विश्वास व्यक्त केला गेला आहे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात जवळजवळ 50 हजार रुग्ण आढळले आहेत. अशात राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागेल अशी चर्चा काही दिवस होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानुसार राज्यात पूर्ण लॉकडाऊन नाही तर, शुक्रवार ते रविवार म्हणजेच वीकएंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील असेही सांगण्यात आले आहे.
याबाबत सरकारने नवी नियमावली तयार केली आहे जी, उद्या रात्री 8 पासून लागू होणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मंत्री मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. दिवसा राज्यात जमावबंदी लागू असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. या काळात सर्व मॉल, बार, उपहारगृहे, इ. बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र होम डिलीव्हरी सुरु असेल. शॉप, मार्केट फक्त गरजेच्या गोष्टींसाठी सुरु राहतील. सरकारी कार्यालये 50 टक्के कार्यक्षमतेने सुरु राहतील, मात्र खासगी कार्यालयातील कर्मचारी घरूनच काम करतील. पार्क, सिनेमागृह बंद असतील.
याकाळात सार्वजनिक वाहतूक- बस, रेल्वे, टॅक्सी सुरु राहणार आहेत. मात्र त्यांच्यातील प्रवासी क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधील लॉकडाउनबाबत हे निर्णय घेण्याआधी सीएम उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याशीही फोनवरून चर्चा केली होती.
लोकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना लॉकडाउनचा सामना करावा लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी अनेकदा दिला आहे. आता आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यात अजून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणत यश आले होते. मात्र मार्चमध्ये कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादले होते. मात्र तरी जनता नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनासाठी आले होते. (हेही वाचा: कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांशी साधला ई-संवाद; उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घेण्याचं केलं आवाहन)
त्यानंतर आज मुख्यमंत्री ठाकरे यांची मंत्रिमंडळ बैठक पार पडली, यामध्ये मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मिनी लॉकडाऊन आणि त्याचसोबत लसीकरण यामुळे कोरोनाची संसर्गाची साखळी तोडली जाऊ शकते अशा विश्वास व्यक्त केला गेला आहे.