Nana Patole: स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने दिल्लीला; MVA सरकारबद्दल Congress प्रभारी एच. के. पाटील यांचे महत्त्वाचे विधान

नाना पटोले सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. हा दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीला गेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील (Congress Maharashtra in Charge H K Patil) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Nana Patole | (Photo Credits: twitter)

महाविकासआघाडी (MVA Maha Vikas Aghadi ) सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून तत्काळ प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. नाना पटोले सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. हा दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीला गेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील (Congress Maharashtra in Charge H K Patil) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एच के पाटील (H K Patil) यांनी म्हटले आहे की, महाविकासआघाडी सरकार महाराष्ट्रात स्थिर आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पण ती स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. विधानसभा, लोकसभा निवडणुकांबाब पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड योग्य तो निर्णय घेईल. दरम्यान, नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत एच के पाटील यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीसाठी नाना पटोले दिल्लीला आले आहेत. महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे स्थिर आहे. सरकार चांगले काम करत असल्याने काँग्रेसकडून सरकारला पाठिंबा कायम राहिल. हे सरकार आणखी पाच वर्षे टीकेल. (हेही वाचा, Maharashtra Congress: नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस आक्रमक? महाराष्ट्रात हाताला गवसणार का स्वबळाचा सूर?)

आम्ही तीन्ही पक्ष (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस) एकत्र आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारला धोका नाही. हिडन ऑपरेशन महाराष्ट्रात चालणार नाही, असा विश्वासही एचके पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नाना पटोले हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. हा दौरा पूर्वनियोजित होता. हा दौराही सुरु झाला होता. असे असताना ते काल (24 जून) अचानक दिल्लीला रवाना झाले. काँग्रेसने स्वबळाची हाक दिली. त्यानंतर महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर पटोले यांनी तातडीने दिल्ली गाठली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. जळगाव येथे बोलताना नाना पटोले यांनी म्हटले होते की, आमचा स्वबळाचा निर्णय झाला आहे. आता माघार नाही. निवडणुकीला अद्याप तीन वर्षे आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. पक्ष वाढविणे यात काहीच गैर नाही, असेही नाना पटोले म्हणाले होते.