आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय आता 62 वर्ष; ठाकरे मंत्रीमंडळाचा निर्णय
आज पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या (Health Department Officials) सेवानिवृत्तीसाठी वयोमर्यादा आता 61 वरुन 62 वर्ष करण्यात आली आहेत. आज पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी यासंदर्भातील माहिती दिली. (राज्यात कठोर लॉकडाउन लागू करा अन्यथा पूर्णपणे सूट द्या, राजेश टोपे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती)
या निर्णयानुसार आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालया अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ आणि राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ पदावरील अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष असणार आहे.
ANI Tweet:
त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन देण्यासाठी निकषही निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली. तसंच राज्यातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णवाढ मंदावली असली तरी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात येणार नाही, असंही टोपेंनी स्पष्ट केलं आहे. लसीकरणावर भर देणार असून यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्याला दरमहा 3 कोटी लसींच्या डोसेची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्यास पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.