Maharashtra Cabinet Meeting Decisions: आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना दहा लाख अनुदान; दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Cabinet Meeting Decisions: मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली यामध्ये अनेक महात्वाच्रे निर्णय घेण्यात आले. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल.

राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरु होती.

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये 4 टक्के आरक्षण 30 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल. 30 जून 2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल.

शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. माझगाव येथील पारिजात इमारतीत १६, केदार इमारतीतील ३ अशा १९ न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने ३२ अशा ५१ सदनिका ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्यात येतील.

नाशिक जिल्ह्यातील मौ.अंबड येथे एमआयडीसीला विस्तारीकरणासाठी १६ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या जमिनीची किंमत २४ कोटी २ लाख ४० हजार इतकी असून ती विनामूल्य एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात येईल. (हेही वाचा: Pune Shocker: मानवतेला काळिमा! पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अपंग रुग्णाला रात्री निर्जनस्थळी सोडून दिले; गुन्हा दाखल, डॉक्टर निलंबित)

राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून, पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात २२ जुलै पर्यंत ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे.  मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता.