Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वृत्त, इच्छुकांच्या आकांक्षांना नवे धुमारे
त्यामुळे सहाजिकच एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या वाढलेल्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरले. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज झाले. त्यांना विकासनिधी देऊन नाराजी दूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत खरे.
राज्य मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) आणखी एक विस्तार होऊ घातल्याचे समजते. हा विस्तार विद्यमान महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काही राज्यमंत्री आणि एखाददुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याची भर पडण्याची शक्यता आहे. या विसातारात महायुतीतील घटकपक्षांना म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेगटातील काही चेहऱ्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे या तिन्ही पक्षातील आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यातील कोणाला संधी मिळते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
राजकीय वर्तुळात या विस्ताराबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. एबीपी माझाने सूत्रांच्या हाल्याने या विस्ताराबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंड केले. थेट भाजपसोबत जाऊन हातमिळवणी केली. यामध्ये एकनाथ शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद आणि काही खात्यांची मंत्रिपदं मिळाली. पण, त्या तुलनेत अजित पवार गटाला मात्र सत्तेत प्रचंड वाटा मिळाला. इतका की शिंदे गट एका दणक्यात मागे फेकला गेला. त्यामुळे शिंदे गटाची घासाघीस करण्याची शक्तीही कमी झाली. (हेही वाचा, 'मिल बैठेंगे तीन यार' मुंबईत आज Maha Vikas Aghadi ची महत्त्वाची बैठक)
अजित पवार गटाला दुसऱ्यांदा झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चक्क 9 मंत्रीपदे मिळाली. त्यामुळे सहाजिकच एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या वाढलेल्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरले. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज झाले. त्यांना विकासनिधी देऊन नाराजी दूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत खरे. पण, अनेक आमदारांनी मंत्रिपदाची झूल आगोदरच पांघरुन ठेवली आहे. त्यामुळे आता ती घेऊन त्यांना लोकांसमोर, त्यांच्या मतदारसंघात जायचे आहे. जे अजित पवार गटाच्या एन्ट्रीमुळे प्रत्यक्षात उतरु शकले नाही. अशातच आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी आल्याने पुन्हा एकदा अनेकांच्या इच्छा आणि आकांक्षांना धुमारे फुटले आहेत.ॉ
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यानंतर शिंदे गटात खास करुन . भरत गोगावले, संजय शिरसाठ, संतोष बांगर, बच्चू कडू या मंडळींची नावे अधिक चर्चेत आहेत. ही सर्वच मंडळी आपणच मंत्री होणार असे प्रसारमाध्यमांसमोर मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होती. त्यामुळे लोकांमध्ये ही मंडळी आता चर्चेचा विषय ठरली आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यांमध्ये अजित पवार गटाला झुकते माप मिळाल्याचे पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीदरबारी अनेक चकरा मारुन पाहिल्या. मात्र, त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्याउलट अजित पवार गटाला मात्र एकाच फेरीत बरेच काही मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता महायुतीत आणि खास करुन शिंदे गटातील आमदारांमध्येही चलबिचल असल्याची चर्चा आहे.