Maharashtra Cabinet Decision: पंढरपूर विकास आराखड्यासाठी विशेष पुनर्वसन धोरण मंजूर; गडचिरोली क्रीडा संकुल व PWD साठी मोठे निर्णय
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा – २ मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पायाभूत सुविधा, क्रीडा विकास आणि नगर विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री क्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी विशेष पुनर्वसन धोरणाला मंजुरी देण्यात आली असून, गडचिरोली क्रीडा संकुल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाशी निगडित महत्त्वाच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
१. पंढरपूर विकास आराखड्यास गती; विशेष पुनर्वसन धोरण मंजूर
श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील सुमारे ३,९९३.९० कोटी रुपयांच्या विकासकामांना गती देण्यासाठी विशेष पुनर्वसन धोरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पंढरपूरचे धार्मिक व पारंपरिक महत्त्व, वर्षभर येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती आणि या विकास प्रकल्पाची तातडीची गरज लक्षात घेऊन हे धोरण आखण्यात आले आहे. प्रकल्पबाधितांसाठी विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने हे धोरण तयार केले असून यामुळे बाधित घटकांना योग्य दिलासा मिळणार आहे.
२. गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधीचा मार्ग सुलभ
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा – २ मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या क्रीडा संकुलाच्या सुमारे ८०.१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी आता अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. यामुळे दुर्गम भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
३. सार्वजनिक बांधकाम विभागात 'ट्रेड्स' प्रणाली
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये (PWD) पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी ट्रेड्स (TReDS) प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक (MSME) तसेच कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत मिळण्यास मोठी मदत होणार आहे.