Maharashtra Budget Session 2024: अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल 26 फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे. यामध्ये आज 27 फेब्रुवारी दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे निवडणूकींचं वर्ष असल्याने अजित पवारांकडून मांडला जाणारा आजचा अर्थ संकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कडून अंतरिम अर्थसंकल्पात (Interim Budget) कोणत्या मोठ्या घोषणा होणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी 2 वाजता अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत.
अंतरिम बजेट असल्याने आज अर्थमंत्री अजित पवार हे पुढील चार महिन्यांसाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्यातील विकास कामांसाठी पुढील चार महिन्यात लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद त्यामधून केली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांचे भत्ते, राज्याच्या असलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज, आगामी निवडणुकांसाठी लागणारा खर्च त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. Maharashtra Assembly Budget Session: राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात; मराठा आरक्षण मुद्द्यावरुन विरोधकांची विधानभवनाबाहेर निदर्शने (Watch Video) .
Maharashtra Assembly Live या अधिकृत युट्युब चॅनेल सोबतच राज्यातील जनतेला टेलिव्हिजन वर देखील दुपारी 2 वाजल्यापासून आजचा अंतरिम अर्थसंकल्प लाईव्ह पाहता येणार आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये पुरवणी मागण्यांवर मतदान आणि चर्चा होईल त्यानंतर दुपारी 2 नंतर अर्थसंकल्प मांडला जाईल. राज्यात सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस यांच्या सरकार मध्ये अजित पवार यांची एंट्री झाली. त्यांच्याकडून मांडला जाणारा महायुतीच्या सरकार मधील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
2023 मध्ये, एकनाथ शिंदे-भाजप सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5,47,450 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, जो “पंचामृत” तत्त्वावर आधारित होता.