SSC, HSC Re-Exam 2020: दहावी, बारावी फेरपरीक्षांना आजपासून सुरुवात; परीक्षार्थींच्या संख्येत घट
फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा गुणांवर समाधानी नसलेले विद्यार्थी विद्यार्थी जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा देऊ शकतात
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC), बारावी (HSC) च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षांना आज (शुक्रवार, 20 नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा गुणांवर समाधानी नसलेले विद्यार्थी जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा देऊ शकतात. मात्र यंदा कोविड-19 (Covid-19) संकटामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक बिघडले असल्याने या परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जात आहेत. यंदा फेरपरीक्षेला (Re-Exam) दहावीचे तब्बल 42 हजार 634 विद्यार्थी तर बारावीसाठी 67 हजार 6.3 विद्यार्थी बसले आहेत. दरम्यान, दरवर्षीच्या तुलनेत या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. या फेरपरीक्षा राज्यातील 672 केंद्रांवर होणार आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वाढलेले निकाल, लांबलेली परीक्षा, कोरोनाची भीती यामुळे परीक्षार्थींच्या संख्येत घट झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी फेरपरीक्षा जुलै महिन्यात पार पडतात. त्यानंतर सप्टेंबरमध्ये निकाल लागून विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळवता येतो. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे फेरपरीक्षांना देखील विलंब झाला आहे. कोविड-19 संसर्ग वाढवण्यापूर्वी 12 वीची परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसंच निकालही लांबणीवर पडले. यंदा बारावीचा निकाल 16 जुलै रोजी तर दहावीचा निकाल 29 जुलै रोजी जाहीर झाला. दहावीचा निकाल 95.30% तर बारावीचा निकाल 90.66% इतका लागला होता. (SSC, HSC Exams 2021 मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड)
पुढील वर्षाची दहावी, बारावीची परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. तसंच 23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांसाठी 50% उपस्थिती अनिवार्य आहे.
दरम्यान, इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु राहणार असून टप्पाटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेच्या शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.