OBC चे राजकीय आरक्षण टिकवण्याच्या मागणीसाठी भाजपचं महाराष्ट्र भर चक्काजाम आंदोलन सुरू
मुंबईच्या मुलूंड चेकनाका पासून नागपूरच्या व्हेरायटी चौकापर्यंत भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणा पाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा (OBC) मुद्दा देखील पेटायला सुरूवात झाली आहे. आज ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात चक्काजाम (Chakkajam Aandolan) आणि जेलभरो आंदोलन (jail Bharo Aandolan) सुरू करण्यात आले आहे. भाजपा कडून ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, प्रविण दरेकर आज रस्त्यावर उतरले आहेत.
ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकवण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर भाजपाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले असताना काही ठिकाणी वाहतूक रोखण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. यामध्ये नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेची वाहतूक ठप्प झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील देवगाव येथे भाजपने रास्ता रोको आंदोलन केले आहे. नागपूरात व्हेरायटी चौकात युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वाहतूक अडवण्यात आली आहे.
पंकजा मुंडे
प्रविण दरेकर
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही आंदोलन सुरू झाले आहे तर मुंबईत मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मावळ मधील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गा उर्से येथे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथेही वाहनाच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या आहेत. मुंबईच्या मुलूंड चेकनाका परिसराला छावणीचं स्वरूप आले आहे. शेकडो पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असून ठिकठिकाणी बॅरिकेटींग देखील करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षणसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत देखील आंदोलन सुरू झाले आहे. पुष्पराज चौक येथे भाजपाचा चक्का जाम सुरू झाले आहे. त्यामध्ये अठरा पगड जाती धर्माची लोक आपल्या पारंपारिक वाद्यांसह आंदोलनात सामिल झालेली पहायला मिळाली आहेत.