Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्याचे हिवाळी अधिवेशन केवळ 10 दिवसात आटोपण्याची शक्यता, जाणून घ्या वेळापत्रक

यंदाही ते पार पडणार आहे. मात्र, वेळापत्रकानुसार हे अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर या कालावधीत म्हणजे केवळ 10 दिवसच पार पडणार असे दिसते आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Assembly Winter Session 2023 Schedule: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर (Winter Session Maharashtra) येथे अपवाद वगळता दरवर्षीच पार पडते. यंदाही ते पार पडणार आहे. मात्र, वेळापत्रकानुसार हे अधिवेशन 7 ते 20 डिसेंबर या कालावधीत म्हणजे केवळ 10 दिवसच पार पडणार असे दिसते आहे. अर्थात जाहीर झालेले वेळापत्रक हे तात्पूरत्या स्वरुपात असल्याचे सांगितले जात आहे. उल्लेखनिय म्हणजे यापूर्वीचा इतिहास पाहता नागपूर येथी अधिवेशन शक्यतो शुक्रवारी समाप्त होते. यंदाच्या वर्षी मात्र हे अधिवेशन दोन दिवस आगोदर म्हणजेच बुधवारी समाप्त होत असल्याचे हे वेळापत्रक दर्शवते.

अधिवेशनादरम्यान पार पडणाऱ्या कामकाजाची 10 दिवसांची रुपरेशा आणि दिनदर्शिका तात्पुरत्या स्वरुपात जाहीर झाली आहे. त्यानुसार हे कामकाज 7 डिसेंबर रोजी सुरु होईल आणि 20 डिसेंबरला अधिवेशनाचे सूप वाजेल. त्यामुळे आता हे अधिवेशन दहा दिवसांमध्येच गुंडाळले जाणार का? याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

कमी कालावधीमध्ये अधिवेशन आटोपते घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर विरोध आक्रमक झाले आहेत. विदर्भात अधिवेशन दोन महिने चालले पाहिजे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज सत्तेत आहेत. तेच सरकार चालवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ते विदर्भाचे आहेत. त्यामुळे त्यांनी अधिवेशन हे नागपूर कराराप्रमाणेच चालवले पाहिजे. त्यासाठी हिवाळी अधिवेशन दोन महिने घेतले पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यंदाचे हिवाळी अधिवेशन विशेष गाजण्याची शक्यता आहे. यामध्ये ललीत पाटील ड्रग्ज प्रकरण, कंत्राठी नोकर भरती निर्णय, राज्यातील दुष्काळी स्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, पाणीटंचाई, अतिवृष्टी यांसोबतच शाळांचे खासगिकरण, रस्तेवाहतूक, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात यांसह इतरही विविध प्रश्नांवर विरोधक राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पूर्वी नागपूर येथे पार पडलेले हिवाळी अधिवेशन विशेष वादळी झाले होते. विधानसभा अध्यक्ष विरोधकांना पुरेसा वेळ देत नसल्याचा आरोप झाला होता. त्यातच अध्यक्षांबद्दल असंसदीय शब्द वापरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले होते. केवळ निलंबनच नव्हे तर संपूर्ण अधिवेशन काळात त्यांना विधिमंडळ परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली होती.

या वेळच्या अधिवेशानमध्ये राज्यातील बदलती राजीकीय परिस्थीती कळीचा मुद्दा असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात बंड करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्री पद स्वीकारले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून उडी घेत भाजपशी हातमिळवणी केली. सध्या ते आणि त्यांचे सहकारी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि मंत्री आहेत.