Ajit pawar In Legislative Assembly: शिवलेले कोट वापरा त्याला उंदीर लागतील; अजित पवार यांचा सत्ताधारी आमदारांना टोला
राज्यातील विकासाचा असमतोल, विकासासाठी आवश्यक पावले आणि त्यानुसार आवश्यक तरतुदींकडे लक्ष वेधतानाच अजित पवार यांनी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांना चिमटेही काढले.
नागपूर (Nagpur) येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Humorous Speech) यांनी तडाखेबंद भाषण केले. राज्यातील विकासाचा असमतोल, विकासासाठी आवश्यक पावले आणि त्यानुसार आवश्यक तरतुदींकडे लक्ष वेधतानाच अजित पवार यांनी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांना चिमटेही काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोजकेच मंत्री राज्यशकट हाकत आहेत. यावरुन फिरकी घेत 'शिवलेले कोट वापरा. नाहीतर त्याला उंदीर कुरतडतील. शेवटी आता यांच्या घरातलेही लोक यांना विचारत आहेत. हे शिवलेलं कधी वापरायचं आहे. लग्नात घातलं नाही ते नाही.. आता तरी वापरा', असे म्हणत अजित पवार यांनी मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या आमदारांवर निशाणा साधला.
राज्यातील केवळ उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता सर्व विभागांना मुख्यमंत्री पद मिळाले आहे. याकडे लक्ष वेधतानाच कोणत्याही मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राच्या विभाजनाचा विचार करु नये. विकासाचा असमतोल असेल तर त्यावर विचार करु. आवश्यक असतील त्या तरतुदी करु. पण एकत्र राहू. वेगळा तेलंगणा जसे राज्य केले तसा काही प्रकार आपल्याकडे नको. एकाच भाषेची दोन राज्ये नको, अशी भूमिका या वेळी अजित पवार यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, Khanapur Atpadi Assembly Constituency: गोपीचंद पडळकर यांच्या दाव्यामुळे अनिल बाबर यांची उमेदवारी धोक्यात! एकनाथ शिंदे गटाला धक्का?)
दरम्यान, राज्यात अनेक लोक केवळ ऊस कारखानदारीवर बोलतात. पण ऊस कारखाना चालवणे हे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. त्याला प्रचंड मेहनत आणि दूरदृष्टी असावी लागते. ऊस कारखानदारीवर बोलताना केवळ त्यावर टीका करुन चालणार नाही. त्यामुळे आलेल्या सुबत्तेकडे आणि शेतकऱ्यांना मिळालेल्या पैशांकडेही लक्ष द्यायला हवे. सूतगिरीणी, रेशीम उद्योग, मत्स्यव्यवसाय, शेळीपालन अशा उद्योगांनाही चालना द्यायला हवी असे अजित पवार म्हणाले.