काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
त्यांच्या या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलय.
काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलय. आज दुपारी नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याच्या शर्यतीत नाना पटोले यांचे नाव देखील आघाडीवर असल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, नाना पटोले आजा दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. त्यानंतर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली. सर्वांनी आपल्याला आजवर दिलेल्या साथीबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.हेदेखील वाचा- बाळासाहेब थोरात यांची उपमुख्यमंत्री पदी लागू शकते वर्णी? पहा काय म्हणाले अजित पवार
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा अध्यक्ष, काँग्रेसचाच होणार की शिवसेनेचा? याबाबतही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या एक पाऊल जवळ नाना पटोले पोहोचले असल्याचे बोलले जात आहे.