Maharashtra Assembly Elections: 'शरद पवार साहेब, तुमच्या चार पिढ्याही जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणू शकत नाहीत'- Amit Shah

जम्मू-काश्मीर विधानसभेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात कलम 370 परत आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

Amit Shah (फोटो सौजन्य - ANI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections) तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे महाराष्ट्रातील राजकीय तापमान वाढत आहे. राहुल गांधींनी भाजपवर केलेल्या हल्ल्यानंतर आता अमित शहांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी (8 नोव्हेंबर 2024) राहुल गांधी, काँग्रेस आणि महाविकास आघाडी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील एका सभेत अमित शहा म्हणाले की, शरद पवारांच्या चार पिढ्याही जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 (Article 370) परत आणू शकत नाहीत. महाराष्ट्रातील शिराळा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 'नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्षाने जम्मू आणि काश्मीर विधानसभेत काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असे कलम 370 परत आणण्याची मागणी केली आहे. आज मी संभाजी महाराजांच्या भूमीवरून म्हणतोय - शरद पवार साहेब, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी आम्ही कलम 370 परत येऊ देणार नाही.’

आपल्या भाषणात अमित शहा यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत झालेल्या गदारोळाचा उल्लेख करताना, शरद पवार आणि काँग्रेसचे सदस्य कलम 370 चे समर्थन करत असल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीर विधानसभेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात कलम 370 परत आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव मांडत असताना विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला आणि त्यावरून भाजपचे आमदार आणि सत्ताधारी यांच्यात बाचाबाची झाली. यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.

शहा म्हणाले, 'हे आघाडीचे लोक ना देश सुरक्षित करू शकतात, ना देशाची इज्जत वाढवू शकतात. हे काम करायचे असेल तर पीएम मोदींचे हात बळकट करावे लागतील. अमित शहा म्हणाले की, शरद पवार शेतकरी आहेत, पण शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्याचे काम मोदींनी केले. शरद पवारांवर निशाणा साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, शरद पवार यांनी दहा वर्षे सत्तेत असताना महाराष्ट्राला काय दिले ते सांगावे. (हेही वाचा: Shiv Sena-UBT' 'Vachan Nama': महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांनी प्रसिद्ध केला शिवसेना-यूबीटीचा जाहीरनामा; जाणून घ्या दिलेली आश्वासने)

सांगलीच्या शिराळा येथे सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी आलेल्या अमित शहा यांनी शिराळ्यातील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात 20 तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. दोन महिन्यांपूर्वी मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात आणायचे आहे. आता महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत.