Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण; पोलीस यंत्रणा सज्ज, अंमलदार, होमगार्ड तैनात, ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर

निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.

Election Commission, EVM (PC - ANI)

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) च्या मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील 9.70 कोटींहून अधिक मतदारांसाठी 1 लाख मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांसाठी राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत एकाच टप्प्यात होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील 9.70 कोटी मतदारांसाठी 241 सहायक मतदान केंद्रांसह 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था पूर्ण केली आहे.

एकूण 990 मतदान केंद्रे गंभीर श्रेणीमध्ये सूचीबद्ध केली आहेत आणि या संवेदनशील केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रशासन 67,557 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबवणार आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदान कर्मचारी आणि अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर प्रदान करण्यात आलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचे यादृच्छिकीकरणही करण्यात आले आहे. एकूण 288 मतदारसंघात 4.136 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. निवडणुकीसाठी आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर मनुष्यबळ तैनात करून अवैध रोख रक्कम, दारू, अवैध अग्निशस्त्रे, अंमली पदार्थ, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक कालावधीत बंदोबस्ताकरीता सीएपीएफ/ एसएपी/ एसआरपीएफ कंपन्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या आहेत. (हेही वाचा : Maharashtra Election 2024: पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! 16 कोटी 14 लाख रुपयांची रोकड, दारू आणि इतर साहित्य जप्त)

निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सुद्धा पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी सर्व घटकां‌द्वारे ड्रोनचा व्यापक वापर केला जात असून विधानसभा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र पोलीस सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.