Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात 9.7 कोटींहून अधिक मतदार; शंभरी पार केलेले तब्बल 47,389 लोक करणार मतदान, निवडणूक आयोगाने शेअर केली माहिती
त्यामध्ये पुरूष मतदार 5 कोटी 22 हजार 739, महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 तर, तृतीयपंथी मतदार 6 हजार 110 इतक्या मतदारांची नोंदणी झाली.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) जाहीर झाल्या असून, राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानानंतर तीन दिवसांनी 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल येतील. दरम्यान, निवडणूक आयोगाने एक अतिशय रंजक माहिती शेअर केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मतदानासाठी पात्र असलेल्या 9.7 कोटींहून अधिक मतदारांपैकी 100 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मतदारांची संख्या 47, 389 आहे. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकूण 7,994 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार 5 कोटी 22 हजार 739, महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 तर, तृतीयपंथी मतदार 6 हजार 110 इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात 88 लाख 49 हजार 590 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 45 लाख 79 हजार 216 पुरूष मतदार, 42 लाख 69 हजार 569 महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार 805 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 लाख 78 हजार 928 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 3 लाख 36 हजार 991 पुरूष मतदार, 3 लाख 41 हजार 934 महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार 3 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरातील 28 पोलीस Deputy SP आणि ACP अधिकाऱ्यांच्या बदल्या)
या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) 1 लाख 16 हजार 170 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 1 लाख 12 हजार 318 पुरूष मतदार तर, 3 हजार 852 महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात वयाची शंभरी पार केलेले 47 हजार 389 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार 21,089, महिला मतदार 26, 298 तर तृतीयपंथी मतदार 2 इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तेसाठी मुख्य लढत सत्ताधारी पक्षांची महायुती आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी अर्थात एमव्हीए यांच्यात आहे. याशिवाय राज्यात छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे, तर विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे.