Thackeray vs Thackeray: ठाकरे विरुद्ध ठाकरे उमदेवार देणार? वरळी विधानसभा मतदारसंघात सामना रंगणार?

या पार्श्वभूमिवर मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिल्यास मराठी मतांचे मतविभाजन होऊ शकते. तसेच, त्याचा फटका आदित्य ठाकरे यांना बसू शकतो.

Thackeray And Thackeray | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या कुटुंबांपैकी एक अशी ओळख असलेल्या ठाकरे कुटुंबियांतील निवडणूक लढविणारे आदित्य हे पहिले ठाकरे आहेत. त्यामुळे सहाजिकच राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आणि चर्चाही आहे. या पार्श्वभूमिवर उत्सुकता आहे की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) वरळी विधानसभा मतदारसंघातून (Worli Assembly Constituency) आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या 27 उमेदवारांची पहिली यादी काल (2 ऑक्टोबर 2019) जाहीर झाली. या यादीत वरळी मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नव्हता.

मनसे उमेदवाराबाबत उत्सुकता

वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवार देणार किंवा नाही, याबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. मनसे नेते संतोष धुरी हे गेली प्रदीर्घ काळ या मतदारसंघात कार्यरत आहे. पक्षाधेश येताच आपण निवडणूक लढवायची असा धुरी यांचा मनोदय असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पक्षाने धुरी यांना तयारीत राहा असे म्हटले आहे. मात्र, अद्याप उमेदवारीबाबत कोणताही निर्णय दिला नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिला आहे.

पुतण्याच्या मदतीला काका धावणार?

दरम्यान, सूत्रांची माहिती अशी की, पुतण्याच्या मतदीला काका धावण्याची शक्यता आहे. आदित्य हे ठाकरे कुटुंबातील निवडणुक लढविणारे पहिले व्यक्तिमत्व आहे. ठाकरे कुटुंबाच्या राजकीय प्रवासाबाबत बोलायचे तर राजकारणापेक्षा ठाकरे कुटुंबातील नातेसंबंधांना अधिक प्राध्यान्य दिल्याचे आणि ते जपल्याचेही महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे या वेळीही हाच विचार करुन राज ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी देणार नाहीत, असे वृत्त आहे.

मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या आधीच म्हटले आहे. या पार्श्वभूमिवर मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिल्यास मराठी मतांचे मतविभाजन होऊ शकते. तसेच, त्याचा फटका आदित्य ठाकरे यांना बसू शकतो. त्याउलट इथे मनसेने उमेदवार दिला नाही तर, त्याचा फायदा आदित्य ठाकरे यांना होऊ शकतो. या पार्श्वभूमिवर मनसे काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे.