Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांवर निलंबनाची कारवाई

राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन बंडखोरांचे निलंबन केले आहे.

Sharad Pawar | Photo Credit- X

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बंडखोरी केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याआधी भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) बंडखोरांविरोधात कारवाईची बडगा उगारला होता. आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) दोन बंडखोरांचे निलंबन केले आहे.

राहुल जगताप निलंबित

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Assembly Constituency) महायुतीकडून विक्रम पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटातून राहुल जगताप यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली. यामुळे राहुल जगताप नाराज झाले होते. त्यानंतर जाहीर सभा व रॅली काढून माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

राजू तिमांडेही निलंबित

तर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात महायुतीतून विद्यमान आमदार समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार राजू तिमांडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे हिंगणघाटमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. आता राजू तिमांडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने कारवाईची बडगा उगारला आहे. राजू तिमांडे यांना निलंबित करण्यात आले आहे.