शिवसेना-भाजप युतीवर ठाम पण, संशय कायम; जे. पी. नड्डा यांच्या सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या
त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच, 'आमचं ठरलंय' असं म्हणता म्हणता 'आमचं रद्द झालंय' असंही हे दोन्ही पक्ष म्हणू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Maharashtra Assembly Election 2019: 'आमचं ठरलंय' असं म्हणत शिवसेना भाजप युती (Shiv Sena BJP Alliance) झाल्याबद्दल राज्यातील नेते एकमेकांना आश्वस्त करत आहेत. दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांकडून युतीबाबत निश्चितता वर्तवली जात आहे. पण, असे असले तरी, दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांबद्दल संशयाचे पिशाच्च कायम असल्याचे दिसते आहे. त्यात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda ) यांनी शनिवारी (20 जुलै 2019) 'युतीचा विचार न करता तयारीला लागा!' असा सूचक संदेश भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच, 'आमचं ठरलंय' असं म्हणता म्हणता 'आमचं रद्द झालंय' असंही हे दोन्ही पक्ष म्हणू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तयारीला लागा
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हे शनिवारी (20 जुलै 2019) मुंबईत दाखल झाले. त्यांनी दादर येथील वसंतस्मृती येथे पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी दरम्यान बोलताना नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सूचक संदेश दिला. ते म्हणाले 'शिवसेनेबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत न बसता आपल्याला सर्व मतदारसंघांत काम करायचे आहे हे लक्षात ठेवून विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांत तयारीला लागा.' दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी ढिलाई येऊ शकते. त्यामुळे आळस झटकून विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनेला नव्या जोमाने कार्यरत करा, असेही नड्डा या वेळी म्हणाले.
जागावाट आणि मुख्यमंत्री पदाचा तिढा
शिवसेना भाजप युतीबाबत निर्णय झाला असला तरी, अद्याप जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यात युतीच्या निर्णयात खोडा घालणारी मंडळी दोन्ही पक्षात आहे. त्यामुळे ही मंडळी आधूनमधून युतीत बेबनाव निर्माण होईल अशी विधाने करताना दिसतात. त्यामुळे युतीचा निर्णय झाला असला तरी दोन्ही पक्षांतील काही मंडळी परस्परविरोधी विधाने करताना दिसतात. जागावाटपाचा तिढा हे दोन्ही पक्ष किती शांततेत आणि मतभेद टाळून सोडवतात यावरही युतीचे भवितव्य अवलंबून आहे. 2014 मध्ये तुटलेली युती ही जागावाटपाच्या मुद्द्यावरुनच तुटली होती. विधानसभा निवडणूक 2019 लढताना शिवसेना भाजप हे प्रत्येकी 144 जागा लढवणार आहेत. तसेच, दोन्ही पक्ष बोलून दाखवत आहेत. परंतू, 144 जागा लढवताना काही जागांची आदलाबदलीही करावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना काही जिंकलेल्या, विद्यमान आमदार असलेल्या जागा सोडाव्या लागतील. आता या जागा हे पक्ष एकमेकांसाठी सोडणार का? हादेखील मोठा प्रश्न आहे. त्यातच दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे युतीचे काय होणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट)
प्रकाश जावडेकर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नड्डा यांचे वक्तव्य
दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवास्थान 'मातोश्री' येथे जाऊन भेट घेतली. शिवसेना भाजप युतीमध्ये जावडेकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत ठरले आहे. मात्र, असे असूनही दोन्ही पक्षांमध्ये युतीचा तिढा कायम आहे. या पार्श्वभुमीवर जावडेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीला महत्त्व आहे. जावडेकर यांनी भाजपच्या बैठकीला हजर राहण्यापूर्वी ठाकरे यांची भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीनंतरच जे. पी. नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना इशारा देणारं सूचक वक्तव्य केले आहे.