Maharashtra Assembly Budget Session 2021: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 'या' मुद्यांवर होऊ शकते चर्चा
8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तमाम जनतेचे लक्ष लागून राहिलेले विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल. यंदा 10 दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून, प्रश्नांवरुन विरोधक सरकारला घेरणार आहेत. तर दुसरीकडे सरकार देखील आपण केलेल्या कामांचा लेखाजोगा अधिवेशनात सादर करतील. वीज बिल, मंत्र्यांवरील आरोप, शक्ती कायदा, कोरोना व्हायरसची राज्यातील परिस्थिती यांसारख्या अनेक मुद्दयांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
यंदाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च असे दहा दिवस असणार आहे. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.हेदेखील वाचा- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकरुन विधानभवनात येणार; इंधन दरवाढी वरुन घेतला निर्णय
कोरोना व्हायरसची स्थिती आणि कोरोना लसीकरणाची प्रक्रिया याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरण, वनमंत्री संजय राठोड यांसारख्या अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरतील. आज राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात करून 10 मार्चला अर्थसंकल्पावर चर्चा करुन या अधिवेशनाची सांगता करण्यात येईल.
दरम्यान नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जाणार आहे. अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार असल्याचं कळतं.