Pune: दारु पिण्याचा वादातून वाढदिवशीच एकाची हत्या, दोघांना अटक; पुण्यातील धक्कादायक घटना
ही घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलीस चौकशीतून निष्पन्न झाले. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) दोन जणांना अटक केली आहे.
पुण्यातील (Pune) न्हावरे गावात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलीस चौकशीतून निष्पन्न झाले. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) दोन जणांना अटक केली आहे. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समजत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेतील दोन्ही आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
कानिफनाथ पांढरकर (वय, 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते शेतकरी होते. पांढरकर यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी त्यांचे मित्र वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी त्यांना दुचाकीवरून शेतात घेऊन गेले. मात्र, रात्री उशीर होऊनही पांढरकर घरी परतले नाहीत. ज्यामुळे पांढरकर यांच्या पत्नी अंजली (वय, 35) यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पांढरकर यांचा फोन बंद असल्याने अंजली यांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी (16 ऑगस्ट) पांढरकर यांचा शेतात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. त्यांच्या डोक्याला दुखापत आणि चेहरा विद्रुप असल्याने पोलिसांना हत्येचा संशय आला. हे देखील वाचा- Amravati: पोलीस ठाण्यातच आरोपीची गळफास लावून आत्महत्या, अमरावती येथील घटना
याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपास सुरू केला. दरम्यान, पांढरकर यांनी त्यांचा वाढदिवस दोन व्यक्तींसोबत घालवण्याचे पोलीस चौकशीतून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनीच पांढरकर यांची हत्या केल्याचे कबूल केले. वाढदिवसाच्या दिवशी पांढरकर आणि आरोपीचा दारू पिण्यावरून वाद झाला. या वादातूनच आरोपींनी पांढरकर यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे समजत आहे.