Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येणाऱ्या अनुयायांसाठी अनेक सुविधा; विशेष रेल्वे सेवा, तात्पुरता निवारा, शामियाना, भोजनाची सोय, जाणून घ्या सविस्तर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे.
Mumbai Mahaparinirvan Din 2023: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून ते सहा डिसेंबरपर्यंत आलेल्या अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आरोग्य व्यवस्था, स्वच्छता यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.
महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथे आले होते. यावेळी राज्य आणि देशभरातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यांच्या निवास आणि भोजनाच्या सुविधेची माहिती घेतली.
चैत्यभूमीपासून सर्वात जवळचे स्थानक दादर असल्याने, महापरिनिर्वाण दिनासाठी दादर स्थानकावरही विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
चैत्यभूमी स्थळी चौकशी काउंटर आणि UTS काउंटर. तसेच 5 डिसेंबरपासून दादर आणि सीएसएमटी स्थानकांवर प्रत्येकी 2 अतिरिक्त UTS काउंटर.
4 डिसेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत 18 लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वे सेवा चालवल्या जाणार आहेत. दिनांक 5/6 डिसेंबर मंगळ/बुधवार रात्री 12 उपनगरीय विशेष ट्रेन सेवा चालवल्या जातील.
दादर पीएफ क्र. 6 आणि सीएसएमटी मेनलाइन कॉन्कोर्स येथे हेल्प डेस्क सेवा.
दिनांक 5/6 डिसेंबर रोजी दादर, कल्याण, ठाणे, एलटीटी, सीएसएमटी स्थानकांवर चोवीस तास वैद्यकीय पथक, तर दादर स्थानकावर रुग्णवाहिका असेल.
दादर स्थानकावर चैत्यभूमीकडे जाण्याच्या मार्गाचे संकेत दिले आहेत
दादर स्टेशनवर 140 RPF आणि 250 GRP अतिरिक्त कर्मचारी तैनात असतील.
सीएसएमटी, एलटीटी, कल्याण स्थानकांवर प्रत्येकी 24 अतिरिक्त आरपीएफ असतील.
दादर येथे 40, सीएसएमटी येथे 20, कल्याण येथे 10, एलटीटी येथे 10 अतिरिक्त व्यावसायिक विभाग कर्मचारी तैनात असतील. (हेही वाचा: Mahaparinirvan Din Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'हे' अनमोल विचार शेअर करून करा महामानवाला त्रिवार अभिवादन!)
MCGM द्वारे दादर स्टेशन परिसरात अतिरिक्त तात्पुरती मूत्रालये/शौचालये उभारली जातील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.