Uddhav Thackeray: 'मातोश्री'वर विरोधकांची खलबत; उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबतच्या आक्षेपांवरही चर्चेची शक्यता

या बैठकीत महाविकासाघाडीतील विविद मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षीत आहे. प्रामुख्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे.

Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

शिवसेना (Shiv Sen) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री (Matoshree) येथे आज (11 ऑगस्ट) विरोधकांची एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकासाघाडीतील विविद मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षीत आहे. प्रामुख्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मित्रपक्ष काँग्रेस (Congress) नाराज आहे. काँग्रेसने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. ही निवड करताना शिवसेनेने आम्हाला विचारलेदेखील नाही. ही दुर्दैवी बाब आहे. या निवडीवर आमचा आक्षेप आहे, अशी भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे आज दुपारी 12.30 वाजता ही भेट होणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, महाविकासआघाडीतील एकूण संख्याबळानूसार पाहिले तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद आम्हालाच मिळायला हवे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभेत विरोधी पक्षनेते पद आहे, शिवसेनेकडे विधानपरिषदेचे उपाध्यक्ष पद आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचाच विचार होणे आवश्यक असल्याची भावना बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Ambadas Danve: अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड)

विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल काय?

विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या- 78

शिवसेना (उद्धव ठाकरे) -12

राष्ट्रवादी काँग्रेस- 10

राष्ट्रीय काँग्रेस- 10

लोक भारती-1

पीजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- 1

राष्ट्रीय समाज पक्ष- 1

अपक्ष- 4

रिक्त जागा-15

दरम्यान, महाविकासआघाडीतील तिन्ही घटक पक्षांची आज एक बैठक होणार आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाण या बैठकीला हजर असणार आहेत. मला वेळ मिळाला तर मी सुद्धा या बैठकीला जाणार आहे. या बैठकीत आम्ही आमच्या भावना व्यक्त करु. महाविकासआघाडी म्हणून आम्ही जर मित्र आहोत, आघाडी आहे तर एकामेकांशी बोलले पाहिजे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.