Luxury Real Estate: लक्झरी घरांच्या किंमतीबाबत जगात मुंबई तिसऱ्या, तर दिल्ली पाचव्या स्थानावर; Knight Frank च्या अहवालात समोर आली माहिती

या शहरात घरांच्या किमती दरवर्षी 26.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Representational image of a housing society (Photo Credits: IANS)

Luxury Real Estate: देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) घर खरेदी करणे आता सोपे राहिलेले नाही. महागड्या घरांच्या बाबतीत जगातील 44 देशांमध्ये मुंबई तिसऱ्या तर दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी नाइट फ्रँकच्या (Knight Frank) अहवालात म्हटले आहे की, जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान मुंबई आणि दिल्लीमधील घरांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याआधी जानेवारी-मार्च 2023 मध्ये मुंबई सहाव्या आणि दिल्ली 17व्या स्थानावर होते.

नाइट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स Q1, 2024 अहवालानुसार, महागड्या घरांच्या बाबतीत मनिला जगातील 44 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या शहरात घरांच्या किमती दरवर्षी 26.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. फिलीपिन्सची राजधानी मनिला हे लुझोन बेटावरील दाट लोकवस्तीचे शहर आहे. जपानची राजधानी टोकियो दुसऱ्या स्थानावर आहे. टोकियोमधील घरांच्या किमतीत वार्षिक 12.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत मुंबईतील मुख्य निवासी विभागाच्या किमतींमध्ये वार्षिक 11.5 टक्के वाढ झाली आहे.

2024 च्या पहिल्या तिमाहीत बेंगळुरूचे रँकिंग घसरले आहे आणि यासह ते 17 व्या स्थानावर पोहोचले आहे. 2023 च्या पहिल्या तिमाहीत बेंगळुरू 16 व्या स्थानावर होते. जानेवारी-मार्चमध्ये बेंगळुरूमध्ये घरांच्या किमती 4.8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुढील काही तिमाहीत विक्रीची गती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, कारण आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Regulations Regarding Hoardings: मुंबईमध्ये होर्डिंग्जबाबतचे नियम झाले कडक; घाटकोपर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये, जाणून घ्या सविस्तर)

नाइट फ्रँकनुसार, प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स (PGCI) हा मूल्यमापन-आधारित निर्देशांक आहे, जो त्याच्या जागतिक संशोधन नेटवर्कमधील डेटा वापरून जगभरातील 44 शहरांमधील प्रमुख निवासी किमतींच्या हालचालींचा मागोवा घेतो. वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 8% पेक्षा जास्त दराने चालू असताना, संपूर्ण भारतातील मजबूत आर्थिक वाढीमुळे मुख्य शहरांमध्ये, विशेषत: दिल्ली आणि मुंबईमध्ये घरांच्या किमती वाढल्या आहेत.