LPG Became Expensive: गॅस महागला, चुलीत जाळण्यासाठी सरपण तर कामाला येईल; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभेवेळी लोकांनी खेचले होर्डींग्ज
हे होर्डींग्ज सोबत घेऊन जाताना त्यांनी दिलेले कारण भलतेच धक्कादायक आणि मजेशीर आहे.
भाजपचे राष्ट्रीय अद्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या सभेसाठी आलेले काही नागरिक सभास्थळावरील काही होर्डींग्ज चक्क सोबत घेऊन गेले आहेत. हे होर्डींग्ज सोबत घेऊन जाताना त्यांनी दिलेले कारण भलतेच धक्कादायक आणि मजेशीर आहे. लोकांनी सांगितले की, घरातील स्वयंपाकाच गॅस इतका महागला (LPG Became Expensive) आहे की, जो खरेदी करणेच परवडत नाही. त्यामुळे हे होर्डींग्ज घेऊन गेलो तर त्याचे लाकडू तरी सरपण म्हणून वापरता येईल. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापुड गढमुक्तेश्वर (Hapud Garhmukteshwar) येथील जेपी नड्डा यांच्या सभेत हा प्रकार घडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापुड गढमुक्तेश्वर येथील सभेसाठी भाजपने मोठा खर्च केला होता. या सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी संबोधित केले. एनडीटीव्ही आणि एबीपी ने दिलेल्या वृत्तानुसार, जेपी नड्डा यांच्या सभेवेळी काही लोक होर्डींग खेचताना आढळले. त्यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता लोकांनी सांगितले की, सिलेंडर 1000 रुपये झाले आहे. त्यामुळे आम्ही ते पुन्हा खरेदी करु शकत नाही. यावेळी काही महिलाही होर्डींग्ज खेचत होत्या. त्यांनीही सांगितले की, सिलेंडर पुन्हा भरु शकत नाही. त्यामुळे हे होर्डींगचे लाकूड तरी चुलीला सरपण म्हणून काही काळ वापरता येईल. (हेही वाचा, '15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार मान्य आहे, त्यात काही गैर नाही'; BJP नेता Janaradan Mishra यांचे वादग्रस्त विधान)
भाजप मुख्यालयाने दिलेल्या एका निवेदनानुसार नड्डा यांनी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, सन 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप जोरदार विजय मिळवणार आहे. त्यांनी म्हटले की, भाजपचा विजय म्हणजे जातियवाद, गुंडागर्दी आणि तुष्टिकरणाचा पराभव असेल. कानपूर येथील अत्तर व्यवसायिकाकडे सापडलेल्या 250 कोटी रुपयांच्या घबाडाचा संबंध जोडत हा पैसा अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातच कमावण्यात आल्याचा दावा केला.