Loudspeaker Controversy: 'सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकेपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाजवत राहू'- मनसे अध्यक्ष राज ठाकरे
त्यांनी आज सकाळी 6 वाजण्यापूर्वी लाऊडस्पीकरचा वापर केला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी सांगितले की, सरकार जोपर्यंत लाऊडस्पीकरवर (Loudspeakers) सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई करत नाही आणि या समस्येचे निराकरण करत नाही तोपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालीसा पाठ सुरूच राहील. 12 एप्रिल रोजी मनसे प्रमुखांनी महाराष्ट्र सरकारला 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर याबाबत वाद निर्माण झाला. लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर, मनसे कार्यकर्ते लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवतील, असा इशारा त्यांनी दिला होता.
आज पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘माझ्या माहितीनुसार, मुंबईत 1,140 हून अधिक मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून पहाटे 5 वाजता अजान वाजवली. आम्हाला राज्यात शांतता हवी आहे. पोलीस फक्त आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. माझा मुद्दा असा आहे की सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर मशिदींमधून काढून टाकण्यात यावेत, जोपर्यंत ते हटवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू.’
मनसे प्रमुख पुढे म्हणाले, ’हे फक्त मशिदींबद्दलच नाही तर अशी अनेक मंदिरे आहेत जिथे बेकायदेशीर लाऊडस्पीकर सुरू आहेत. मी आधीच स्पष्ट केले आहे की ही (बेकायदेशीर लाऊडस्पीकर) धार्मिक समस्या नसून सामाजिक समस्या आहे. सरकार आदेशाचे पालन करत नसेल तर सर्वोच्च न्यायालय काय करते हे मला पहावे लागेल.’ जोपर्यंत सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवले जात नाहीत तोपर्यंत मनसे कार्यकर्ते अजानच्या वेळी मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाजवत राहतील, असेही ठाकरे म्हणाले. (हेही वाचा: राजकारणासाठी वापर करून भाजपने राज ठाकरेंचा बळी घेतला आहे, संजय राऊतांचा आरोप)
महाराष्ट्राच्या गृह विभागाने आज आधी सांगितले की, शहरात एकूण 1,140 मशिदी आहेत, त्यापैकी 135 मशिदी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात गेल्या. त्यांनी आज सकाळी 6 वाजण्यापूर्वी लाऊडस्पीकरचा वापर केला. दरम्यान, सध्याच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर मनसे प्रमुख निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्यात सकाळपासून पोलिसांनी सुमारे 250-260 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.