Loudspeaker Controversy: 'मनसेच्या आंदोलनामुळे हिंदूंचे अधिक नुकसान, मुंबईमधील 2,404 मंदिरे लाऊडस्पीकर वापरू शकणार नाहीत'- काँग्रेस नेते Sachin Sawant
सार्वजनिक समारंभातही लाउडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी मनसेच्या भूमिकेला विरोध केला.'
सध्या राज्यात सर्वत्र लाऊडस्पीकर प्रकरणाचीच चर्चा सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ठाकरे यांनी मशिदींच्यावरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर चालू होते त्या ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे अनेक मंदिरांच्यावरील भोंगेदेखील उतरत आहेत. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी गुरुवारी सांगितले की, मनसेच्या या आंदोलनामुळे हिंदूंचे अधिक नुकसान होईल कारण 2,404 मंदिरे लाऊडस्पीकर वापरू शकणार नाहीत.
‘सकाळची लाऊडस्पीकरवरील अजान मुस्लिमांनी बंद केली आहे. परंतु त्याचबरोबर काकड आरतीही बंद झाली आहे. मनसेमुळे हिंदूंना जास्त त्रास झाला आहे,’ असे सावंत म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘मुंबईत एकूण 2404 मंदिरे आणि 1144 मशिदी आहेत. कालपर्यंत यापैकी फक्त 20 मंदिरे आणि 922 मशिदींनीच परवानगी घेतली. 5 मंदिरे आणि 15 मशिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे म्हणणे मान्य केले तर, तर मशिदींसह या 2400 मंदिरांना लाउडस्पीकर वापरण्याची परवानगी मिळणार नाही. मनसेच्या आंदोलनाचे सर्व धार्मिक समुदायांवर परिणाम होतील.’
सावंत म्हणाले, ‘चर्च, गुरुद्वारा आणि बौद्ध मंदिरांनादेखील लाउडस्पीकरचा वापर करता येणार नाही. सार्वजनिक समारंभातही लाउडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्व धर्माच्या प्रतिनिधींनी मनसेच्या भूमिकेला विरोध केला. त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीत येथील लाउडस्पीकरवरील काकड आरती बंद झाली, यासाठी कोण जबाबदार?’ (हेही वाचा: राज्यात 2,300 हून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 7000 जणांना कलम 149 CrPC अंतर्गत नोटीस)
ते म्हणाले, ‘मनसेची राजकीय स्वार्थी भूमिका, त्यांचा वेडेपणा आणि भाजपचा पाठिंबा पुरोगामी महाराष्ट्रासाठी हानीकारक आहे. भाजप शासित राज्यांनी लाऊडस्पीकरवर बंदी का घातली नाही याचे कारण अगदी स्पष्ट आहे.’ दरम्यान, काल राज्यात विविध समाजातील धार्मिक नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर चर्चा केली. जर लाऊडस्पीकर वापरायचा असेल तर केवळ मंदिरे आणि मशिदींनीच नाही तर इतर धार्मिक स्थळांनीही लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले आहे.