अर्जुन खोतकर-रावसाहेब दानवे यांच्यातील तिढा सुढला; खोतकरांनी माघार घेतल्यानंतर जालना मतदारसंघातून दानवे लढवणार निवडणूक
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेना नेते अर्जुन खोतकर जालना येथून निवडणूक लढवणार होते
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raisaheb Danve) यांच्या विरोधात शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) जालना (Jalna) येथून निवडणूक लढवणार होते. मात्र अखेर त्यांनी माघार घेतली असून दानवे यांचा निवडणूकाचा मार्ग मोकळा झाल आहे. आज (17 मार्च) औरंगाबाद येथे भाजपा-शिवसेना (BJP-Shivsena) नेत्यांमध्ये सुरु असलेल्या बैठकीत खोतकर-दानवे हा वाद मिटला आहे.
हा तिढा सुटल्यानंतर अर्जुन खोतकर म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म समजवून सांगितला. या धर्माप्रमाणे पहिली परीक्षा मी पास होईन. दुसरी परीक्षा तुमची आहे. तुम्हीही पास व्हा. जिल्ह्यात लागलेली आणीबाणी आज उठली." तसंच उद्धव ठाकरेंच्या विरोधात मी गेलो नाही. मी कडवट शिवसैनिक आहे, दगाफटका करणार नाही. जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडू, असं आश्वासनही खोतकरांनी यावेळी दिलं.
गेल्या अनेक दिवसांपासून खोतकर-दानवे यांच्यात शीतयुद्ध सुरु होते. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातून नेमकं निवडणूक कोण लढवणार, याबद्दल चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने दानवे-खोतकर हा वाद अखेर मिटला आहे.