Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार लढत असलेली मावळची जागा जिंकू असे आम्हाला कधीच वाटले नव्हते: शरद पवार
आता EVM बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात अर्थ नाही. जनतेचा आलेला निकाल हा जनतेचा निर्णय आहे. हा निर्णय स्वीकारून कामाला लागायला हवे. सुरुवातील EVM बद्दल आमच्या मनात जरुर काही प्रश्न होते. पण, आता थेट जनतेचाच निर्णय आला आहे. त्यामुळे आता पुन्हा EVM चा बागलबुवा करण्यात अर्थ नाही, असेही पवार म्हणाले.
Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 मध्ये जनतेचा कौल आम्ही स्वीकारत आहोत. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या एकूण जागांपैकी काही जागांचे निकाल आले आहेत. मात्र, त्या जागांपैकी एकूण 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, 'पार्थ पवार लढत असलेली मावळची जाग जिंकू असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. ती जागा पहिल्यापासूनच डळमळीत होती', असेही शरद पवार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक मतमोजणीनंतर काही जागांचे निकाल आणि कल हाती आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पवार बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडणुकीचा निकाल जो लागायचा तो लागला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. ज्या जागांवर आमचा पराभव झाला. त्या जागांवर आमचा पराभव फारशा अधिक फरकाने झाला नाही. महाराष्ट्राबाहेरही राष्ट्रवादीने लढवलेल्या जागांपैकी एक जागा निवडूण आली. त्यामुळे लोकसभेत आम्हाला आणखी एक जागा वाढली आहे, असेही पवार म्हणाले.
तातडीने दुष्काळग्रस्त भागात जाणार
दरम्यान, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपण तातडीने दुष्काळग्रस्त भागात जाणार आहोत. दुष्काळ निवारणासाठी जे काम आपण हाती घेतले आहे ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत राहणार आहोत असेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Maval Lok Sabha Election Result 2019: पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघामध्ये पराभूत; श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय)
माढ्यातून मी उभा राहणार नव्हतोच
माढ्यातून निवडणूक लढविण्याचा आपण कधीच विचार केला नव्हता. लोकसभा लढवायची नाही हा निर्णय आपण 2014 मध्येच घेतला होता. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघात आमच्या पक्षात सहकाऱ्यांमध्येच काही मतभेद होते. त्यामुळे हे मतभेद पाहून तुम्ही लढत नसाल तर, माढ्यातून मी लढतो, असे म्हणालो होते, अशी आठवणही पवार यांनी सांगितली.
आता EVM बद्दल प्रश्न उपस्थित करण्यात अर्थ नाही
आता निवडणूक निकाल लागला. आता EVM बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात अर्थ नाही. जनतेचा आलेला निकाल हा जनतेचा निर्णय आहे. हा निर्णय स्वीकारून कामाला लागायला हवे. सुरुवातील EVM बद्दल आमच्या मनात जरुर काही प्रश्न होते. पण, आता थेट जनतेचाच निर्णय आला आहे. त्यामुळे आता पुन्हा EVM चा बागलबुवा करण्यात अर्थ नाही, असेही पवार म्हणाले.